ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर

ठाणे : शहरात आज अवघे ३३ नवीन कोरोना रुग्ण सापडले असून ९९जण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.५५ टक्क्यांवर पोहचले आहे. एक जण दगावला आहे.

महापालिका हद्दीतील आठ प्रभाग समित्यांच्या हद्दीमध्ये एक आकडी रूग्ण सापडले आहेत. सर्वात जास्त १६-रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. सहा जण लोकमान्य-सावरकरनगर, चार रूग्ण दिवा आणि तीन जण वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात वाढले आहेत. उथळसर प्रभाग समिती भागात दोन रूग्ण मिळून आले आहेत. प्रत्येकी एक रूग्ण नौपाडा-कोपरी आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नोंदला गेला आहे तर वागळे आणि कळवा प्रभाग समिती हद्दीत एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ९९जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८०,४७०जण ठणठणीत बरे झाले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ५२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एक जण दगावला असून आत्तापर्यंत २,१२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरांतील १,११८ नागरिकांची चाचणी घेतली असून त्यामध्ये ३३जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ६४,१०८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,१२०जण बाधित मिळाले आहेत.