टोरंटो जितो अर्ध मॅरेथॉनसाठी ठाणे सज्ज

ठाणे : जितो एज्युकेशनल अँड मेडिकल ट्रस्टतर्फे २०मार्च रोजी टोरंटो जितो ठाणे हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. टोरंटो जितो ठाणे हाफ मॅरेथॉनचे आयोजन ठाणे महानगरपालिका, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि श्री महावीर जैन हॉस्पिटल यांच्या समन्वयाने केले जाणार आहे.

हाफ मॅरेथॉनचा लोगो आणि रेस डे जर्सीचे अधिकृत उद्घाटन ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्‍हस्‍के आणि ठाणे महानगरपालिका आयुक्‍त डॉ. विपीन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. या हाफ मॅरेथॉनचे प्रमुख उद्दिष्ट कर्क रोगाप्रति जागरूकता निर्माण करण्याचे असून या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना ‘रन फॉर कॅन्सर’ ही आहे.

या उपक्रमातून क्रीडाप्रेमी, व्यावसायिक धावपटू आणि सर्व ठिकाणच्या लोकांना एकत्र आणले जाणार आहे. देशभरातील हजारो धावपटू आणि प्रेक्षक या स्पर्धेत सहभागी होतील हा उपक्रम जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या धावण्याच्या उपक्रमांपैकी एक होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

ही स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे. अर्ध मॅरेथॉन (२१ किमी), १० किमी स्पर्धा असून पाच किमीची स्पर्धा हौशी तसेच कुटुंबे आणि मुलांसाठी असेल. ही स्पर्धा सर्व वयोगटातील, क्रीडा क्षमता असलेल्यांसाठी खुली असेल. या स्पर्धेला रेमंड ग्राऊंड, ठाणे येथून सुरूवात होईल.

हाफ मॅरेथॉन (२१ किमी) आणि १० किमी या वेळेवर आधारित स्पर्धा असतील. २० मार्च २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले सहभागी (हाफ मॅरेथॉन), १६ वर्षे वयाच्या (१० किमी) आणि १२ वर्षे वयाच्या (५ किमी) खेळाडूंना यात सहभाग घेता येईल. विजेत्यांना एकूण १८ लाख रूपयांची पारितोषिके दिली जातील. ती विविध वर्गवारींमध्ये वितरित करण्यात येतील. विविध प्रकारचे अ‍ॅथलीट, अभ्यागत आणि मान्यवर यांच्यासह टोरंटो जितो ठाणे हाफ मॅरेथॉनच्या पहिल्या स्पर्धेचे आयोजन करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ठाण्याच्या रस्त्यांवर जागतिक दर्जाची हाफ मॅरेथॉन विशेषतः कोविडच्या जागतिक साथीनंतर एक कार्यरत आणि सुदृढ जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी आणणे ही आमच्यासाठी उत्साहाची बाब आहे,” असे मत जितो ठाणे चॅप्टरचे अध्यक्ष महेंद्र जैन यांनी व्यक्त केले.

”जितो ठाणे हाफ मॅरेथॉन फक्त रेस नाही. ही एका हेतूसाठी धावण्याची उत्तम संधी असून त्यातून कर्करोगाच्या विविध स्वरूपांबाबत जागरूकता निर्माण केली जाईल आणि या गंभीर आजाराने ग्रस्त समाजातील कमकुवत वर्गातील लोकांना मदत केली जाईल,”असे मत जितो एज्‍युकेशनल अॅण्‍ड मेडिकल ट्रस्‍टचे व्‍यवस्‍थापकीय विश्‍वस्‍त अजय अशर यांनी व्‍यक्त केले.

या स्पर्धेचे आयोजन कोविड सुरक्षा नियमांनुसार केले जाईल. टोरंटो जितो ठाणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी सहभागींचे दोन्ही लसीकरण झालेले असले पाहिजे किंवा त्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असला पाहिजे. आयोजकांकडून सुरूवात करणाऱ्यांना मॅरेथॉनच्या दिवसासाठी तयार करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि फिटनेस टिप्स दिल्या जातील. असे आयोजकांनी सांगितले.