वालधुनी नदीसाठी सरसावले शेकडो हात

* पहिल्याच दिवशी १० टन कचरा काढला
* १०० दिवस चालणार मोहीम

अंबरनाथ : अंबरनाथमधून वाहणाऱ्या वालधुनी नदी स्वच्छता आणि संवर्धन  मोहिमेला आज १४ फेब्रुवारीपासून उत्साहात सुरुवात झाली. विविध  सामाजिक संस्था, शालेय  विद्यार्थ्यांच्या आणि नगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सुमारे १० टन कचरा गोळा करण्यात आला. कचऱ्याचा अडसर दूर होताच पाण्याचा  प्रवाह मोकळा झाला होता.

मलंगगडच्या डोंगरातून अंबरनाथच्या शिवमंदिराच्या परिसरातून पूर्वी बारमाही वाहणाऱ्या नदीला वाढत्या प्रदूषणाचा विळखा पडला होता.  त्यामुळे नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. नदी पूर्वीप्रमाणे शुद्ध होण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज जागतिक व्हेलेण्टाईन दिनापासून जागतिक पर्यावरण दिनापर्यंत लोकसहभाग आणि  श्रमदानातून नदी स्वच्छता उपक्रम  नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.

काकोळे गावातील जीआयपी धरण  परिसरापासून आज सकाळी आरोग्याधिकारी सुरेश पाटील, आरोग्य निरीक्षक सुहास सावंत यांच्या उपस्थितीमध्ये सगुणा रुरल फाऊंडेशनचे चंद्रशेखर भडसावळे,  स्वच्छता दूत सलील जव्हेरी, मातोश्री ट्रस्ट भालचंद्र भोईर प्रतिष्ठान, उप सरपंच नरेश गायकर ब्राईटनेस  संस्था, अर्पण महिला योगा केंद्र, शशिकांत दायमा, यांच्यासह अंबरनाथ, उल्हासनगरमधील पर्यावरणप्रेमी नागरिक, बालवाडी भगिनी मंडळ शाळा यांनी उपक्रमात भाग घेतला. शिवमंदिराजवळ वालधुनी नदीमध्ये पाणी अडवून त्याठिकाणी बंधारा बांधण्यात येणार असून त्यात जिवाणू टाकण्यात येणार आहेत, अर्पण योगा मंडळ,  युवा युनिटी फाऊंडेशन आणि भगिनी मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे नदी संवर्धनाचे महत्व विशद केले.

वालधुनी नदीचे पाणी प्यायलेली पिढी  अंबरनाथमध्ये शिल्लक असेल. सध्या मात्र नदी किनाऱ्यावरून जाताना तोंडाला रुमाल बांधूनच जावे लागते. नदी स्वच्छता मोहीम टिपिकल सरकारी मोहीम वाटू नये, या कामाची कोणत्याही प्रकारे निविदा काढली जाणार नाही. सरकारी निधीमधूनही मोहीम केली जाणार नाही. लोकसहभागातून होणारी कामे दीर्घकाळ टिकतात, सरकारी अधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या मोहिमा अधिकाऱ्यांची बदली होताच बंद पडतात, त्यामुळे नागरिकांचा उत्साह कमी होतो, हे प्रकार  टाळण्यासाठी लोकसहभागातून वालधुनी नदी स्वच्छता मोहीम सुरु करण्यात येत आहे, स्वच्छता करण्याबरोबरच त्याठिकाणी वनीकरण केल्याने जैव विविधता वाढू लागेल, ५ जूनपर्यंत चालणाऱ्या नदी संवर्धन मोहिमेत प्रत्येकाने सहभागी व्हावे,  नदीला गतवैभव देण्याचा प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन पालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी व्यक्त केले.