ब्लॅकलिस्ट कंपनीलाच पाच कोविड रुग्णालयाची कंत्राटे

माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच काळ्या यादीत टाकलेल्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला पाच कोविड सेंटरचे कंत्राट कसे देण्यात आले, असा सवाल भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी केला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहानिमित्ताने पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमांचे लाखो रुपयांचे बिल कोणी भरले, असा सवालही डॉ. सोमय्या यांनी केला.

भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या दादा पाटील वाडी येथील कार्यालयात डॉ. किरीट सोमय्या यांनी भाजपा कार्यकर्त्यांबरोबर आज रविवारी संवाद साधला. या वेळी भाजपचे महापालिका गटनेते मनोहर डुंबरे, संजय वाघुले, भाजयुमो कोकण प्रदेश शहर सहसंयोजिका वृषाली वाघुले यांची उपस्थिती होती.

पुणे येथील कोविड सेंटरमधील गैरव्यवहाराविरोधात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडे सर्व पुरावे देण्यात आले आहेत. मात्र, त्याबाबत काहीही बोलले जात नाही. परंतु, गैरव्यवहाराचे पुरावे दिले. म्हणून मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास निघाले आहेत. त्यांनी आधी पुराव्याबाबत बोलायला हवे. महाराष्ट्राची जनता वेडी असल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटत आहे का, असा सवाल डॉ. सोमय्या यांनी केला.
मुख्यमंत्री पिता लाईफलाईन हॉस्पिटलला ब्लॅक लिस्ट करतात. तर पालकमंत्री पुत्र त्याच कंपनीला पाच हॉस्पिटलचे कंत्राट देतात, या विरोधाभासाकडे डॉ. सोमय्या यांनी लक्ष वेधले. या कंपनीने मुंबई-पुणे कोविड सेंटरसाठी अर्जही प्रशासनाकडे केलेले नाहीत, असा आरोप डॉ. सोमय्या यांनी केला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहाचे कार्यक्रम पंचतारांकित हॉटेलमध्ये झाले. त्याचे बिल बोगस कंपन्यांनी दिले होते का? असा सवाल डॉ. सोमय्या यांनी केला. तर पुणे येथे माझ्यावर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाईंडला अटक झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही डॉ. सोमय्या यांनी दिली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डनला माफी दिली, तरी त्यांना २१ कोटी रुपये भरावे लागतील. त्यासाठी भाजपा कायदेशीर लढाई जाईल, असे त्यांनी नमूद केले.