मीरा-भाईंदरच्या नाट्यगृहाचे एप्रिल महिन्यात होणार लोकार्पण

ज्येष्ठ कलाकारांकडून नाट्यगृहाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील महाजनवाडी, काशीमीरा येथे भव्य नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या नाट्यगृहाचे लोकार्पण एप्रिल महिन्यात केले जाणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी जेष्ठ नाट्य-सिने कलावंतांनी नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. त्याची पालिका अंमलबजावणी केली जाईल असे आयुक्त यांनी सांगितले.

मीरा-भाईंदरमधील महाजनवाडी, दहिसर चेकनाका येथे हायवेलगत सुरू असलेल्या नाट्यगृह इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तळ अधिक चार मजल्याच्या नाट्यगृह इमारतीत दोन नाट्यगृह असणार आहेत. एक मोठे नाट्यगृह असून त्यात ८६० आसने असतील तर छोट्या नाट्यगृहात ३४२ आसने असणार आहेत. तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आर्ट गॅलरी तयार करण्यात येत आहे. बेसमेंटमध्ये पार्किंगची सुविधा असणार आहे. आज नाट्य कलावंत भरत जाधव, शरद पोंक्षे, अभिनेते व आर्किटेक्ट राजन भिसे, अभिनेते सुशांत शेलार यांनी आमदार प्रताप सरनाईक, पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्यासह नाट्यगृहाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी नाट्यगृहात कलाकारांना कोणत्या सुविधा हव्या आहेत, परिपूर्ण नाट्यगृह कसे असावे यादृष्टीने कलाकारांनी सूचना केल्या. पाऊण तास नाट्यगृहाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर नाट्यगृहात कोणते बदल करावेत, कोणत्या नवीन सुविधा असाव्यात याबाबत आमदार, आयुक्त व कलाकार यांच्यात बैठक पार पडली. त्यानुसार कलाकारांना सुलभ होतील अशापद्धतीने काही बदल केले जाणार आहेत. नाट्यगृहात जे नाट्य प्रयोग होतील त्या नाटकाची बस येण्यासाठी नाट्यगृहाच्या परिसरात पुरेशी जागा, नाटकाचे सेट नाट्यगृहात नेण्यासाठी मोठी लिफ्ट, कलाकारांच्या मेकअप रूम यासह आवश्यक त्या गोष्टी करण्याबाबत कलाकारांनी सूचना केल्या. तसेच नाट्यगृहात साउंड सिस्टीम, प्रकाश व्यवस्था, रंगमंचाची व्यवस्था याबाबत कलाकार, आर्किटेक्ट यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

यावेळी प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले की, नाट्यगृह बांधत असताना उदघाटनापूर्वी कलाकारांना बोलावून त्यांच्या नाट्यगृहाबाबत सूचना पहिल्यांदा अशाप्रकारे जाणून घेतल्या जात आहेत. प्रेक्षकांना येथे सर्व सुविधा मिळतील पण कलाकारांच्यासुद्धा सुविधेचा विचार केला गेला आहे. हे नाट्यगृह भव्य तर आहेच पण उदघाटन झाल्यानंतर त्याची नियमित देखभाल दुरुस्ती राहील, हे नाट्यगृह चांगल्या पद्धतीने चालेल याचे नियोजन पालिकेने करावे असे ते म्हणाले.

अभिनेते राजन भिसे यांनी नाटकांसाठी आणि कलाकारांसाठी काय काय सुविधा हव्या आहेत त्याची बारकाईने माहिती पालिका अधिकाऱ्यांना दिली. दहिसर ते विरारपर्यंतच्या नाट्य रसिकांसाठी हे नाट्यगृह म्हणजे मोठी भेट आहे, असे ते म्हणाले. छोटी नाटके, प्रायोगिक नाटके तसेच नाटकांच्या रंगीत तालमींसाठी, चित्र प्रदर्शन, कला प्रदर्शन यासाठी या नाट्यगृहाचा मोठा उपयोग होईल, असे अभिनेते सुशांत शेलार म्हणाले.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या सुविधा भूखंडावर टीडीआरच्या मोबदल्यात हे नाट्यगृह विकासकाकडून बांधून घेण्यात आले आहे. यात महापालिकेचा म्हणजे करदात्या नागरिकांचा एक रुपयाही खर्च झालेला नसून भव्य नाट्यगृह इमारत बांधून उभी राहिली आहे. अंतिम टप्प्यातील काम पूर्ण झाले कि नाट्यगृह लोकार्पणासाठी सज्ज होईल. जवळपास १०० कोटींचा खर्च करून ही इमारत बांधली गेली असून आज कलाकारांनी दिलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एप्रिल महिन्यात नाट्यगृहाचे उदघाटन केले जाईल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

यावेळी पालिका आयुक्तांसह महापालिकेचे शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित आणि जिल्हाप्रमुख, जिल्हासंघटक, विरोधी पक्षनेता, नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.