कल्याण : पोलिसांना घाबरवण्यासाठी पिस्तुल तस्कराने गोळ्या झाडल्याची घटना कल्याणमध्ये घडली असून दोन पिस्टल, दोन मॅगझीन, १६ काडतुसांसह पिस्तुल तस्कराला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. सुरज शुक्ला (२४) असे या इसमाचे नाव असून तो मध्यप्रदेशमधील शुक्लपुरा, तहसील अटेर, जिल्हा- भिंड येथील राहणारा आहे.
कल्याण बाजारपेठ पोलिसांना एक इसम कल्याण पश्चिमेकडील लाल चौकी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बाजारपेठ पोलिसांच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि. सुजित मुंडे, घोलप,पोलीस नाईक सचिन साळवी, भीमराव बागुल, बाविस्कर, पोलीस हवालदार जातक, अत्तार, भोसले या पथकाने आज सकाळच्या सुमारास लाल चौकी परिसरात सापळा रचला. एक इसम संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी त्याला हटकले मात्र या इसमाला संशय आल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. पोलिसांचा पाठलाग सुरुच असल्याने पोलिसांना घाबरवण्यासाठी या इसमाने आपल्याजवळील पिस्तूलाने जमिनीवर गोळ्या झाडल्या. मात्र पोलिसांनी न घाबरता काही अंतरावर त्याच्यावर झडप घालत त्याला अटक केली.
सहायक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनिरी नरेन्द्र पाटील, पो.निरी. राजेंद्र अहिरे, पो.निरी. सुनिल पवार, गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सपोनिरी सुजित मुंढे, सपोनिरी अरुण घोलप, पो.हवालदार पायरी, अत्तार, जातक, भोसले, पो.ना. सचिन साळवी, बागूल, बाविस्कर, सांगळे, पो.शि. चव्हाण व चालक पोलीस शिपाई भोरे यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सुजित मुंढे हे करीत आहेत.