महिलेसह चौघांना अटक
ठाणे : गेल्या आठ दिवसात मुंब्र्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या तीन कारवायांमध्ये मुंब्रा पोलिसांनी एमडी मेफेड्रॉन पावडरसह तीन किलो गांजा आणि नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या १,८०० गोळ्या असा सहा लाख ३१ हजारांहून अधिक किंमतीचा अंमली पदार्थाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी एका महिलेसह चौघांना जेरबंद करण्यात मुंब्रा पोलिसांना यश आले असून फरार झालेल्या तिघांचा शोध सुरू असून यामध्ये दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंब्रा, एम. एम. व्हॅली रोड कौसा येथे एक महिला आणि तिचा साथीदार एमडी पावडर विक्रीसाठी येत असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून माझगाव रोड येथील राबिया युनुस शेख (२५) आणि मुंब्र्यातील सय्यद रिजवान अली (३०) या दोघांना ४ आणि ५ फेब्रुवारी अटक करत त्यांच्याकडून ५५ ग्रॅम वजनाची एमडी पावडर विक्री जप्त केली. त्याची किंमत पाच लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याचदरम्यान मुंब्रा येथील काळसेकर हॉस्पिटलसमोर तीन इसम व एक महिला गांजा व नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून मुंब्र्यातील अख्तर उजुअली इराणी ( ४२) आणि अल्ताफ हुसेन मोनबी शेख (३२) यांना अटक केली. त्यांच्याकडे १० हजार रुपये किंमतीचा एक किलो हिरवट रंगाचा गांजा हा अमली पदार्थ आणि नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ६०० गोळ्या आढळून आल्या. फरार झालेल्या महिलेसह तिच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.