प्रो लीग हॉकी (पुरुष) : भारताकडून आफ्रिकेचा धुव्वा

भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमधील अप्रतिम कामगिरी सुरू ठेवताना बुधवारी दुसऱ्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा १०-२ असा धुव्वा उडवला.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारताने सलामीच्या लढतीत फ्रान्सवर ५-० असा दिमाखदार विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही दर्जेदार खेळ करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. आफ्रिकेविरुद्ध भारताने आक्रमणात उत्कृष्ट खेळ केला. भारताकडून जुगराज सिंग (चौथे, सहावे, २३वे मिनिट), उपकर्णधार हरमनप्रीत सिंग (दुसरे मि.), अभिषेक (१२वे मि.), गुरसाहिबजीत सिंग (२४, ३६वे मि.), दिलप्रीत सिंग (२५, ५७वे मि.), मनदीप सिंग (२७वे मि.) यांनी गोल झळकावले.

भारताने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. दुसऱ्याच मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे यशस्वीरित्या गोलमध्ये रुपांतरण केल्यामुळे भारताने आघाडी घेतली. जुगराजने दोन मिनिटांत दोन गोल केल्याने भारताला ३-० अशी आघाडी मिळाली. तर १२व्या मिनिटाला अभिषेकने आणखी एका गोलची भर घातली. २३व्या मिनिटाला जुगराजने पुन्हा पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावत वैयक्तिक तिसरा आणि संघाचा पाचवा गोल केला. त्यानंतर चार मिनिटांच्या कालावधीत गुरसाहिबजीत, दिलप्रीत आणि मनदीप यांनी केलेल्या गोलमुळे मध्यांतराला भारताकडे ८-० अशी भक्कम आघाडी होती. उत्तरार्धात आफ्रिकेने खेळात सुधारणा केली. ३६व्या मिनिटाला गुरसाहिबजीतने भारताचा नववा गोल केला. मग डॅन बेल (४४वे मि.) आणि रिचर्ड पॉत्झ (४५वे मि.) यांच्या गोलमुळे आफ्रिकेने काहीसे पुनरागमन केले. परंतु दिलप्रीतने ५७व्या मिनिटाला गोल करत भारताला हा सामना १०-२ अशा फरकाने जिंकवून दिला.