राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट ‘तू तेव्हा तशी’ २० मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीस

झी मराठीवरील तू तेव्हा तशी या आगामी मालिकेची अगदी पहिल्या झलक पासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर हि जोडी पाहायला मिळणार आहे.

पहिल्या प्रेमाचं आपल्या आयुष्यात खूप खास स्थान असतं आणि त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर? अशाच अव्यक्त प्रेमाची गोष्ट म्हणजे तू तेव्हा तशी. या मालिकेचा प्रोमो नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित झाली. हि मालिका कधी भेटीस येणार याची आतुरता प्रेक्षकांना होती, त्याच उत्तर देखील मिळालं आहे. हि मालिका २० मार्च पासून रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. येऊ कशी तशी मी नांदायला हि लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी तू तेव्हा तशी हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं कि सौरभ (स्वप्नील जोशी) आणि अनामिका (शिल्पा तुळसकर) हे एकमेकांच्या समोरून जातात पण चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे त्यांना खात्री पटत नाही. पण दोघांच्याही मनात एकंच विचार येतो कि ‘हा तोच/तीच तर नसेल ना? या मास्कमुळे काही कळतच नाही’. सौरभ आणि अनामिका एकमेकांच्या समोर आल्यावर काय होईल हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. लवकरच या मालिकेतून प्रेक्षकांना सौरभ आणि अनामिकाची गोष्ट पाहायला मिळेल.