ठाणे : जिल्ह्यात कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या कमी आढळत असून जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या एका आठवड्यात सुमारे ४५ टक्क्यांनी कमी झाली आहे. १ फेब्रुवारीला जिल्ह्यात १३,२९६ सक्रिय रुग्ण होते तर काल ८ फेब्रुवारी रोजी सक्रीय रुग्ण ७१९२ एवढी असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार राज्यात सक्रिय रुग्ण संख्या असलेल्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये पुणे, नागपूर, ठाणे, अहमदनगर, मुंबई यांचा समावेश होतो. या पाच जिल्ह्यांमध्ये १ फेब्रुवारीला १ लाख १३ हजार ९४६ सक्रिय रुग्ण होते तर एका आठवड्यानंतर ८ फेब्रुवारीला ही संख्या ५७ हजार ७७६ एवढी म्हणजे सुमारे ४९.३० टक्क्यांनी कमी झाली आहे.
राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर हा ९.३० टक्के असून ठाणे जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर राज्य सरासरीपेक्षा खुपच कमी म्हणजे ३.८० टक्के असून मुंबई जिल्ह्याचा दर २.१० टक्के आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर हा राज्य सरासरीपेक्षा कमी असून त्यामध्ये सर्वाधिक कमी दर हा मुंबई आणि ठाण्याचा आहे.
ठाण्यातील हॉट स्पॉट थंडावले
शहरातील कोरोना रुग्णांचा आलेख खाली आला असून आज ६० नवीन रूग्ण सापडले तर २४८जण रोगमुक्त झाले आहेत. दिवा आणि नौपाडा-कोपरी या प्रभाग समिती क्षेत्रात एकही रूग्ण सापडला नाही आणि सुदैवाने कोणीही दगावला नाही.
महापालिका हद्दीतील कोरोना हॉट स्पॉट असलेल्या नौपाडा-कोपरी या प्रभाग समितीमध्ये एकही रूग्ण सापडला नाही तसेच दिवा येथे देखील कोरोनाची पाटी कोरी राहीली. सर्वात जास्त ३२रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात वाढले आहेत. सात रूग्ण वर्तकनगर आणि पाच रुग्णांची भर उथळसर प्रभाग समितीमध्ये पडली आहे. प्रत्येकी सहा जण कळवा आणि लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती परिसरात नोंदवले गेले आहेत. तीन रूग्ण वागळे येथे आणि एकाची नोंद मुंब्रा प्रभाग समिती येथे झाली आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी २४७जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ७९,४३६ रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १,२८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१२२जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,२९७ नागरिकांची चाचणी घेतली. त्यामध्ये ६०जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ५७०६६ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८२,८४७जण बाधित सापडले आहेत.