शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भित्तीशिल्प ठाणेकरांसाठी भूषणावह – पालकमंत्री

ठाणे : जय भवानी…जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात महापालिकेच्या मुख्यालयाच्या दर्शनी भागावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या भित्तीशिल्पाचे अनावरण मंगळवारी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भित्तीशिल्प हे ठाणेकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह ठरणार असून अशा पध्दतीचे भित्तीशिल्प साकारणारी ठाणे ही एकमेव महापालिका असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महापालिका भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, उपमहापौर सौ. पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, माजी महापौर तथा नगरसेविका सौ. मिनाक्षी शिंदे, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रियांका पाटील, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक राम रेपाळे, परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

‘शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे शिवसेना’ असे समीकरणच बनले आहे, गेली 30 वर्षे ठाणेकरांनी शिवसेनेवर जो विश्वास दाखविला आहे तो विश्वास शिवसेनेने सार्थ ठरविला आहे. नागरिकांची कामे पूर्ण केल्याची पोचपावती ठाणेकरांनी आम्हाला दिलेली आहे. ठाणेकरांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या क्ल्स्टर प्रक्ल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात झाली असून आज संक्रमण शिबिराच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. ठाणे महापालिकेच्या समोरुन जाताना दर्शनी भागावर असलेले शिवराज्याभिषेक सोहळयाचे भित्तीशिल्प हे इतिहासाची साक्ष देत आहे, या भित्तिशिल्पाचे आज नुतनीकरण झाल्यानंतर नव्याने त्याला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली असून हे भित्तीशिल्प ठाणेकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह ठरेल असे उद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

ठाणे महापालिकेच्या दर्शनी भागावर असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळयाची डागडुजी करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. परंतु डागडुजी करण्याऐवजी संपूर्ण भित्तीचित्र नव्याने बसवावे या माझ्या मागणीला एकनाथ शिंदेसाहेबांनीही पाठिंबा दिला आणि प्रशासनानेही सहकार्य केले. त्यामुळे आज पुन्हा हे भित्तीचित्र दिमाखात विराजमान झाले आहे. ऐतिहासिक क्षणाची साक्ष देणाऱ्या या भित्तीशिल्पाचे माझ्या महापौरपदाच्या कारकीर्दीत नुतनीकरण झाले ही माझ्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भित्तीशिल्प नवीमुंबई येथील गार्नेट प्रा.लि. या कंपनीने तयार केले असून हे भित्तीचित्र तयार होत असताना वारंवार महापौर नरेश म्हस्के यांच्यासह मी स्वत: व प्रशासनाचे अधिकारी सतत त्यांच्या संपर्कात होतो, अनेकवेळा त्यांच्या कारखान्यात जावून या भित्तीशिल्पाची पाहणी करत होतो, आज अखेर हे भित्तीचित्र दिमाखात उभे राहिले याचा निश्चितच मला देखील अभिमान असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नमूद केले. गार्नेट प्रा.लि.च्या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीमध्ये सुबक अशी प्रतिकृती साकारण्यात आली त्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी महापालिकेतील नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.