नितेश राणे यांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण; आज निर्णय

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मागील काही दिवसांपासून अडचणीत आहेत. नितेश राणे यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत उद्या 11 वाजता निर्णय सुनावणार असल्याचं जाहीर केलं.

जिल्हा सत्र न्यायाधीश रोटे यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आमदार नितेश राणे हे शरण आल्यानंतर कस्टडीमध्ये घेतले नाही, अशी तक्रार करत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आमदार नितेश राणे यांची सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे यांच्या समोर न करण्याचा अर्ज न्यायालयात दिला होता. तर राणेंचे वकील सतीश माने शिंदे यांनी न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला तेव्हापासून सरकारी वकील विविध गोष्टीतून वेळकाढूपणा करत असल्याचं सांगत, दुसऱ्या न्यायालयासमोर सुनावणी घेण्यासाठी केलेला अर्ज बरखास्त करा अशी मागणी केली होती. दरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेत हा अर्ज न्यायालयाने रद्द केला. तर दुसरीकडे जामिन अर्जावरील दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपल्यानंतर निर्णय उद्या 11 वाजता सुनावण्यात येणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं.

सर्वात आधी नितेश राणे यांचे वकील सतीश माने शिंदे आणि संग्राम देसाई यांनी आपली बाजू मांडली. यावेळी शिंदे यांच्याकडून सरकारी वकील प्रदीप घरत हे जामिन मिळू नये यासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला. यावेळी सरकारी वकीलांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये मारहाणीचा कट रचला असा दावा करत व्हॅनिटी व्हॅन तपासण्याची मागणी केली. तर यावेळी कोकण रेल्वेमधूनही प्रवास केला असल्याने कोकण रेल्वे गाडी तपासणी घेतली जाऊ शकते का? असा सवाल शिंदे यांनी केला. तसंच परब यांच्यावरील हल्ल्यानंतर तपासापूर्वीच राणे यांचं नाव मीडियासमोर जाहीर केलं अशी तक्रारही शिंदे यांनी केली. 20 मिनिटे युक्तिवाद केल्यानंतर यावेळी कोतवाल व्यायालयाचा व्यायनिवाडा ही त्यांनी व्यायालयात सादर करत सरकारी पक्षाने बराच वेळकाढूपणा केला असून आतातरी जामिन मिळावा अशी विनंती केली आहे.

शिंदेनंतर वकील संग्राम देसाई यांनीही युक्तिवाद केला. ते म्हणाले, ‘राकेश परब यांनी आपल्या ताब्यातील मोबाईल पोलिसांना दिले आहेत,  तसंच व्हॅनिटी व्हॅनच्या चालकाने कणकवली पोलिसांना सर्व कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. तसंच सुपारी देऊन हल्ला करायला लावला असं  विधान केलं जात असताना पैसे दिले-घेतले असा पोलिसांच्या तपासात कुठेही उल्लेख झालेला नाही. तसंच 11 केसेस नीतेश राणेंवर तर दोन केसेस राकेश परबवर असल्याच आरोप केला जात असून यातील अनेक केसेस खोट्या आहेत. तसंच राणे हे जामिन मिळाल्यास  बाहेर येऊन इतरांना धमकावतील असा आरोप सरकारी पक्षाकडून केला गेल्यानंतर नीतेश राणेंची अशी कोणतीही पार्श्वभूमी नसून त्यांना जामिन मिळावा, अशी विनंती संग्राम देसाई यांनी केली.

शिंदे आणि देसाई यांच्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद मांडत जामिन नाकरण्याची मागणी केली. सर्वात आधी त्यांनी राणेंच्या वकीलांनी परब यांना गंभीर जखम झालं नसल्याचं सांगितलं. त्यावर बोलताना परब यांच्या छातीवर गंभीर जखम करुन मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला, असल्याचं ते म्हणाले. तसंच मारेकऱ्यांनी राणेंशी संपर्क केला होता त्यामुळे हा पूर्वनियोजित कट नाही का? असा सवालही घरत यांनी विचारला. तसंच सर्व मारहाण सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्याचंही घरत म्हणाले. तसंच मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते जो पुण्याचा आहे, त्याच्या संपर्कात नितेश राणे आहेत. परब यांचा फोटो सातपुतेने राणेंना पाठवल्याने हा सर्वात मोठा पुरावा असल्याने मग हा सुपारी देऊन केलेला गुन्हा नाही का? असा सवाल घरत यांनी उपस्थित केला. तसंच संबधित हल्लेखोरांचं परब यांच्याशी कोणतही वैर नसल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. तसंच समोर आलेले CDR रिपोर्ट हा देखील महत्वाचा पुरावा असून राणे आणि सचिन सातपुते या दोघांचं लोकेशन एकत्र कणकवलीमध्ये आढळलं होतं. दरम्यान इतर चारही आरोपींचा जामिन नाकारला तसा राणेंचाही नाकारावा अशी मागणी घरत यांनी केली.