ठाण्यात शिवसेनेची इंग्रजीत बॅनरबाजी

अमराठी मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न

ठाणे : शिवसेना नेते, नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात जागोजगी प्रचंड बॅनरबाजी करण्यात आली आहे. शहरातील मुख्य चौकापासून गल्लीबोळात शिवसेनेच्या प्रमुख नेते, नगरसेवक व आगामी निवडणुकीतील इच्छुकांच्या मोठमोठाल्या होर्डिंगने जागा व्यापलेल्या असतानाच हिरानंदानी मेडोज येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मुख्य चौकात चक्क इंग्रजीतून एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. परिसरात अमराठी मतदारांना साद घालण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका तोंडावर आल्याने पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. याच प्रयत्नात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ९ फेब्रुवारी रोजी असलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर भलामोठा होर्डिंग इंग्रजीतून लावण्यात आला आहे.

युवासेनेचे ठाणे शहर अध्यक्ष नितीन लांडगे यांनी लावलेल्या या होर्डिंगवर प्रमुख नेत्यांच्या छबी झळकल्या असून या पट्ट्यात बहुसंख्य मतदार अमराठी आहेत. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा खटाटोप असल्याची टीका मराठी एकीकरण समितीचे ठाणे शहर उपाध्यक्ष अतुल पिंगळे यांनी केली आहे. दरम्यान, याच चौकात महाराजा अग्रसेन चौकावरील मजकूरही हिंदीत प्रसिद्ध करण्यात आला असून हा इंग्रजीतील बॅनरबाजीचा प्रकारही मराठी भाषिक ठाणेकर जनतेचा अपमान असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.