दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाई यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या ३ मिनिटे १५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये आलिया भट्टचा अभिनय पाहाण्यासारखा आहे. आलियाची दमदार चाल, तिचा भारदस्त आवाज आणि करडी नजर यावरुन तिने भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. ट्रेलरमध्ये कामाठिपुरा इथल्या वैश्या व्यवसायात दबदबा असलेल्या गंगूबाईचा संघर्षमय प्रवास दाखवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या मुलांच्या हक्कासाठी लढताना गंगूबाई दाखवण्यात आली आहे.
मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्पे चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.
मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाचं प्रदर्शन करोनामुळे रखडलं होतं. पण आता हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२१ ला प्रदर्शित होणार होता मात्र करोनाच्या वाढत्या संकटामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे.