टाटा महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-रामनाथन जोडीची विजयी सलामी

पुणे : रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या द्वितीय मानांकित भारतीय जोडीने टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेची विजयी सलामी दिली.

बोपण्णा-रामनाथन जोडीने अमेरिकेच्या जेम्स सेरेटानी आणि निकोलस मोनरो जोडीचे आव्हान ६-३, ३-६, १०-७ असे परतवून लावले. गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा अलेक्झांडर एर्लेर आणि जिरी वेस्ली जोडीशी सामना होईल.

युकी भांब्री आणि दिविज शरण या भारतीय जोडीला मात्र पराभव पत्करावा लागला. भारताच्याच साकेत मायनेनी आणि शशीकुमार मुकुंद जोडीने युकी-दिविज जोडीला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवले. युकी-दिविजचा आधी डेनिस नोव्हाक आणि जाओ सौसा या जोडीशी सामना रंगणार होता. मात्र, डेनिसच्या मांडीला दुखापत झाल्याने या जोडीला माघार घ्यावी लागली आणि त्यांच्या जागी मायनेनी-मुकुंद जोडीला मुख्य फेरीत प्रवेश मिळाला.

डेव्हिस चषक लढतीसाठी नागलऐवजी युकी

डेन्मार्कविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक गट-१ प्ले-ऑफ डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी भारताच्या पाच सदस्यीय संघातून सुमित नागलला वगळण्यात आले आहे. भारताच्या संघात रामकुमार रामनाथन (जागतिक क्रमवारीत १८२वे स्थान), प्रज्ञेश गुणेश्वरन (२२८) आणि युकी भांब्री (८६३) या एकेरीच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय रोहन बोपण्णा आणि दिविज शरण दुहेरीत खेळतील, असे अखिल भारतीय टेनिस संघटनेने सांगितले. साकेत मायनेनी आणि दिग्विजय प्रताप सिंह हे दोन राखीव खेळाडू असतील. जैव-सुरक्षा परिघातील दिल्ली जिमखाना क्लबवर ४ आणि ५ मार्चला हा सामना होईल.