पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं. जे कधीही विसरता येत नाही. आयुष्यभरासाठी त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर…? प्रेम आणि प्रेमकथा म्हंटल कि आपल्या समोर येतो तो मराठी मनोरंजन क्षेत्रामधील लोकप्रिय रोमँटिक हिरो स्वप्नील जोशी. स्वप्नील हा लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
स्वप्नील जोशी सोबत या मालिकेत शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या मालिकेचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. एका लग्नाची दुसरी गोष्ट या अतिशय गाजलेल्या मालिकेनंतर झी मराठीवर स्वप्नील जोशी पुन्हा एकदा तब्बल १० वर्षांनी एका मालिकेत दिसणार असून ‘तुला पाहते रे’ मध्ये राजनंदिनीची लक्षवेधी भूमिका निभावल्यानंतर शिल्पा तुळसकर पुन्हा एकदा झी मराठीवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. सध्या स्वप्नील झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा देखील एक अविभाज्य हिस्सा आहे. तू तेव्हा तशी या मालिकेत स्वप्निल जोशी हा सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर अनामिका दीक्षितच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहेत.
या नवीन कार्यक्रमाबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला, “चाळीशी पार केलेल्या सौरभ – अनामिकाची फ्रेश आणि युथफूल प्रेमकहाणी म्हणजेच ‘तू तेव्हा तशी’. प्रेम करायचं राहून गेलं असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी तर प्रेमात असणाऱ्यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढवणारी, अशी हि मालिका आहे. यावर्षी मी मालिका करणार ठरवलं होतं. मालिकांनी आणि टीव्ही माध्यमाच्या रसिक प्रेक्षकांनी आजवर मला भरभरून प्रेम दिलं आहे. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा येताना मी उत्सुक आहे.”