श्री ग्राहक ‘समर्थ’!

एकेकाळी ठाणेकरांच्या पसंतीस उतरलेले आणि समाधानकारक सेवा देऊन लोकप्रिय झालेले समर्थ भांडार या संस्थेचे पुनरूज्जीवन होत आहे. ही निश्चितच आनंदायी बाब आहे. विश्वासार्हता आणि उत्कर्ष यांच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचलेल्या या संस्थेला काही वर्षांपूर्वी उतरती कळा लागली आणि तिची अवस्था केविलवाणी झाली. जणू कोणाची तरी नजर लागावी असे काहीतरी झाले. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी समर्थ भांडारमध्ये नव्याने प्राण फुंकण्याचा प्रयत्न जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी केला आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा देता आणि संस्थेला पूर्वीचे सोनेरी दिवस प्राप्त होतील ही अपेक्षा व्यक्त करतो.
कितीही संकटे आली तरी माणसाला त्याच्या मूलभूत गरजांना टाळता येणार नाही. त्यांचा प्राधान्यक्रम बदलेलं, काटकसरीचा मार्ग स्वीकारला जाऊ शकेल परंतु जीवनावश्यक वस्तूंना काट मारता येणार नाही. समर्थ भांडार किराणामालाबरोबरच गृहोपयोगी वस्तू, दुध, कपडे आदी वस्तू विकत असे. नवीन रचनेत या जिन्नसांची विक्री होईल असे वाटते. वाजवी दरात दर्जेदार वस्तू ही समर्थची ओळख पुन्हा प्रस्थापित झाली तर ग्राहकांचा विश्वास ते संपादन करू शकतील.
सध्याचे युग मॉलचे आणि सुपर मार्केटचे आहे. पारंपारिक किराणामाल विक्रेत्यांच्या मांडीला मांडी लावून डिपार्टमेंटल स्टोअर गल्लोगल्लीत थाटलेले दिसतात. बिग बझार, डी-मार्ट, स्टार, रिलायन्स यांसारखे महाकाय घाऊक खेळाडूंनी तर अनेक किरकोळ दुकानदारांना धंद्यातून अक्षरशः उठवले आहे. त्यांच्याकडे मिळणारे दर हे अनेकदा अचंबित करणारे असतात. त्यामुळे छोट्यातल्या छोट्या ग्राहकाचे पाय या मोठ्या दुकानांकडे वळतात. भरीस भर, कमी दर आणि आकर्षक ऑफर्स तसेच घरपोच सेवा ही प्रलोभने असतात ती निराळी. अशा वेळी आपल्या जुन्या ग्राहकाला समर्थ कसे खेचून आणणार हा प्रश्न आहे. त्यासाठी त्यांना काही अभिनव कल्पना लढवाव्या लागणार. जे मोठ्या माशांना जमत नाही तशा योजना आखाव्या लागतील. ग्राहकाच्या बदलत्या अभिरुचीचा आणि मानसिकतेचा अभ्यास करावा लागेल. ठाणेकरांना संस्था ‘आपली’ वाटेल असा भावनिक विचार पेरावे लागेल. तसे झाले तर समर्थला अच्छे दिन येतील!