मधुरा बाचल दिसणार किचन कल्लाकारच्या किचनमध्ये

गृहिणींना रुचकर पदार्थ बनवण्यासाठी मार्गदर्शन करणारी त्यांची हक्काची मैत्रीण म्हणजे मधुरा बाचल. मधुरा सगळ्या गृहिणींना ऑनलाईन भेटून नवनवीन पदार्थ करायला शिकवते. पण आता मधुराला प्रेक्षक टीव्हीवर पाहू शकणार आहेत. हो हे खरं आहे. झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या मस्त मजेदार किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या आगामी भागात शेफ म्हणून मधुरा कलाकारांना टिप्स देणार आहे.
किचन कल्लाकार या कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांची महाराजांच्या आवडीचा पदार्थ बनवताना होणारी तारेवरची कसरत पाहणे खूपच रंजक असते. अशावेळी त्यांना शेफ काही टिप्स देऊन त्यांची मदत करतात. या आठवड्यातील २ भागांमध्ये ती शेफची भूमिका मधुरा निभावणार आहे. मधुराच्या टिप्स अनेक गृहिणी फॉलो करतात. आता तिच्या याच टिप्स सेलिब्रिटींना किती उपयोगी येतात ये पाहणं रंजक ठरेल. या आठवड्यात पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे हे कलाकार सहभागी होणार असून मधुरा त्यांच्या पाक-कलेच्या परीक्षेत कशी मदत करते हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.