इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : नेहरा अहमदाबादचा प्रशिक्षक

नवी दिल्ली : भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहराची इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी अहमदाबाद या नव्या संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. इंग्लंडचा माजी सलामीवीर विक्रम सोलंकी या संघाचे क्रिकेट संचालक हे पद सांभाळतील.

भारताला विश्वविजेतेपदाची दिशा दाखवणारे दक्षिण आफ्रिकन गॅरी कस्र्टन या संघाचे प्रेरक म्हणून सूत्रे स्वीकारण्याची चिन्हे आहेत. यासंबंधी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. ‘आयपीएल’च्या १५व्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांची भर पडणार असून एप्रिल-मे महिन्यात भारतातच ‘आयपीएल’चे आयोजन करण्यात येऊ शकते. गतवर्षी करोनामुळे ‘आयपीएल’चा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आला.

दरम्यान, नव्या संघांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नसून या संघांना फेब्रुवारीत होणाऱ्या लिलावप्रक्रियेपूर्वी प्रत्येकी तीन खेळाडूंना निवडण्याची संधी आहे. नेहराने यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला मार्गदर्शन केले असून कस्र्टन यांनाही ‘आयपीएल’मध्ये प्रशिक्षणाचा अनुभव आहे.