जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. क्रिकेटला देखील करोनाचा फटका बसलाय. बिग बॅश लीग आणि ऍशेस मालिकेत करोनाची अनेक प्रकरणं समोर आली होती. त्यानंतर आता करोनाने भारतीय क्रिकेटमध्येही प्रवेश केला आहे. ताज्या अहवालानुसार बंगाल रणजी संघातील सात सदस्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बंगालला विदर्भ, राजस्थान, केरळ, हरियाणा आणि त्रिपुरासह ब गटात ठेवण्यात आले आहे. १३ जानेवारीपासून बंगाल बेंगळुरूमध्ये त्रिपुराविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे सचिव स्नेहशिष गांगुली यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “महामारीची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन, बंगालच्या क्रिकेट असोसिएशनकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंगालच्या सर्व क्रिकेटपटूंच्या आरटीपीसीआर चाचण्या घेतल्या आहेत. त्यापैकी काहींचे रिझल्ट आले असून काही खेळाडूंची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदीप चॅटर्जी, अनुस्तुप मजुमदार, काझी जुनैद सैफी, गीत पुरी, प्रदिप्ता प्रामाणिक, सुरजित यादव आणि सहाय्यक प्रशिक्षक सौरशीष लाहिरी या सहा खेळाडूंना विषाणूची लागण झाली आहे. रविवारी सॉल्ट लेक येथील जाधवपूर विद्यापीठात झालेल्या सांघिक सामन्यादरम्यान हे सात सदस्य उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले की, “त्यांना करोनाच्या कोणत्या व्हेरिएंटची लागण झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.”
यामुळे बंगालचा पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाविरुद्धचा दोन दिवसीय सराव सामना रद्द करण्यात आला आहे. बंगाल दुसऱ्या सराव सामन्यात सहभागी होणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. CAB ने सर्व स्थानिक स्पर्धा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी सर्वोच्च परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
CAB चे अध्यक्ष अविशेक दालमिया आणि सचिव स्नेहशिष यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “सर्वसाधारण करोना परिस्थिती लक्षात घेता, बैठक होईपर्यंत सर्व स्थानिक स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच १५ ते १८ वयोगटातील नोंदणीकृत खेळाडूंचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.”