दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला रोहित मुकणार; राहुलकडे नेतृत्व

नवी दिल्ली : भारताचा नवनिर्वाचित एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा पायाला दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय क्रिकेट मालिकेला मुकणार आहे. त्याच्या जागी फलंदाज के. एल. राहुलची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शुक्रवारी अखिल भारतीय निवड समितीने १८ सदस्यीय संघाची घोषणा केली.

‘‘रोहित अजून तंदुरुस्त झालेला नसून मैदानावर परतण्यासाठी मेहनत घेत आहे. आम्हाला त्याच्याबाबतीत कोणताही धोका पत्करायचा नाही. राहुलला भविष्यासाठी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याने याआधी कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. तो या संघाला योग्य पद्धतीने हाताळेल याची आम्हाला खात्री आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा म्हणाले.

रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे प्रमुख डावखुरे अष्टपैलू पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले नाही. तसेच पहिल्या कसोटीत आठ गडी बाद करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून त्याचा साथीदार जसप्रीत बुमराकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

तसेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडची संघात वर्णी लागली असून त्याला अनुभवी शिखर धवनच्या साथीने सलामीला येण्याची संधी मिळू शकेल. या एकदिवसीय मालिकेचे तीन सामने १९, २१ आणि २३ जानेवारीला पर्ल आणि केप टाऊन येथे होणार आहेत.

एकदिवसीय संघ :

के. एल. राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.