विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : हिमाचल प्रथमच अजिंक्य

जयपूर : सलामीवीर शुभम अरोराचे (१३१ चेंडूंत नाबाद १३६ धावा) दिमाखदार शतक आणि कर्णधार रिशी धवनच्या (नाबाद ४२ आणि ३/६२) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हिमाचल प्रदेशने रविवारी प्रथमच विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात त्यांनी पाच वेळच्या विजेत्या तमिळनाडूला व्हीजेडी पद्धतीनुसार ११ धावांनी पराभूत केले.

जयपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात ३१५ धावांचा पाठलाग करताना हिमाचलची ४७.३ षटकांत ४ बाद २९९ अशी धावसंख्या होती. त्यावेळी अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला आणि व्हीजेडी पद्धतीनुसार हिमाचलला विजेते घोषित करण्यात आले.

तमिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना ३१४ धावांची मजल मारली. त्यांची ४ बाद ४० अशी अवस्था असताना अनुभवी दिनेश कार्तिक (१०३ चेंडूंत ११६) आणि बाबा इंद्रजित (७१ चेंडूंत ८०) यांनी २०२ धावांची भागीदारी रचली. मग अखेरच्या षटकांत शाहरूख खान (२१ चेंडूंत ४२) आणि कर्णधार विजय शंकर (१६ चेंडूंत २२) यांनी फटकेबाजी करत तामिळनाडूला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला.

३१५ धावांचा पाठलाग करताना शुभम अरोरा आणि प्रशांत चोप्रा (२६ चेंडूंत २१) यांनी ६० धावांची सलामी देत हिमाचलच्या डावाची उत्तम सुरुवात केली. त्यानंतर शुभमला अमित कुमार (७९ चेंडूंत ७४) आणि धवन (२३ चेंडूंत नाबाद ४२) यांनी सुयोग्य साथ देत हिमाचलचा विजय सुनिश्चित केला.

’ संक्षिप्त धावफलक

तमिळनाडू : ४९.४ षटकांत सर्व बाद ३१४ ( दिनेश कार्तिक ११६, बाबा इंद्रजित ८०; पंकज जस्वाल ४/५९) पराभूत वि. हिमाचल प्रदेश : ४७.३ षटकांत ४ बाद २९९ (शुभम अरोरा नाबाद १३६, अमित कुमार ७४; बाबा अपराजित १/४५)