मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्यासाठी यंदाचं वर्ष अगदी उत्तम राहिलं. याच वर्षी सूर्यकुमारला भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याला यंदाचा टी-२० विश्वचषक खेळण्याची संधीही मिळाली. वर्षाचा शेवटची सूर्यकुमारने अगदी धडाकेबाज करण्याचा मानस केल्याप्रमाणे तो नुकताच एका स्थानिक क्रिकेटमध्ये खेळलाय. त्याने या सामन्यामध्ये तब्बल २४९ धावा कुटल्यात. या खेळीच्या जोरावर त्याने २०२२ मध्ये संघाचा विचार केला जाईल तेव्हा आपली दाखल घ्यावीच लागेल असं अधोरेखित केल्याचं सांगितलं जात आहे.
सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात २६ डिसेंबरपासून होत आहे. त्यानंतर पुढील महिन्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघ निवड अद्याप झालेली नाही. त्यामुळेच घरगुती क्रिकेटमधील या प्रदर्शनाच्या जोरावर सूर्यकुमार यादवला अंतिम संघामध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जातेय.
सूर्यकुमार यादवने ७४ व्या पोलीस शील्ड स्पर्धेमध्ये तीन दिवसाच्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पारसी जिमखाना संघाकडून खेळताना द्विशतक ठोकलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये सूर्यकुमारने अवघ्या १५२ चेंडूंमध्ये २४९ धावा केल्या. यामध्ये त्याने ३७ चौकार आणि पाच षटकार लगावले. म्हणजेच त्याने ४२ चेंडूंमध्ये चौकार षटकारांच्या मदतीने १७८ धावा कुटल्या.
तीन दिवसांच्या या सामन्यामध्ये पहिल्या दिवशी सूर्यकुमार यादवच्या द्विशकताच्या जोरावर त्याच्या संघाने ९० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात ५२४ धावा केल्या. सूर्यकुमारबरोबरच आदित्य तरेने ७३ तर सचिन यादवने ६३ धावांची खेळी केली. याचबरोबर विक्रांतनेही ५२ धावांची खेळी करत आपलं अर्धशतक साजरं केलं. दुसरीकडे सिद्धेश लाडने भन्नाट गोलंदाजी करत ४० धावांच्या मोबदल्यात तीन गडी तंबूत पाठवले. एमसीए दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करते. या स्पर्धेमध्ये अनेक नावाजलेले खेळाडू आवर्जून खेळतात.
सूर्यकुमारने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ६२ च्या सरासरीने १२४ धावा केल्यात. ५३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ९ डावांमध्ये ३५ च्या सरासरीने २४४ धावा केल्यात ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. एकंदरित टी-२० क्रिकेटचा विचार केल्यास त्याने १७३ डावांमध्ये ३१ च्या सरासरीने ४ हजार १२६ धावा केल्यात. यामध्ये २४ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या २०२२ च्या पर्वासाठी मुंबई इंडियन्सने आठ कोटी देऊन सूर्यकुमारला रिटेन केलं आहे.
३१ वर्षीय सूर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाच हजारांहून अधिक धावा केल्यात. त्याप्रमाणे लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याने ३ हजार धावा केल्यात. त्याचा अनुभव आणि खेळी पाहता त्याचं दक्षिण आफ्रिकेचं तिकीट निश्चित मानलं जात आहे.