मुंबईत गारुड कोणाचे?

कोलकाता महापालिकेत तृणमुल काँग्रेसने मिळविलेले घवघवीत यश या पक्षाच्या होऊ घातलेल्या भाजपाविरोधी आघाडीचे नेतृत्त्व करण्यासाठी पोषक ठरणार आहे. १४४ सदस्य असणार्‍या महापालिकेत तृणमुलने १३४ जागा जिंकल्या तर भाजपाच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या. १६ विधानसभा मतदार संघांचा समावेश असणार्‍या महापालिकेत भाजपाला एकही मतदार संघ राखता आला नाही. त्यांची मतदानाची टक्केवारी २० टक्क्यांनी घटली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपाला धूळ चारली होती. भाजपाचे दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरूनही त्यांची ममतासमोर डाळ शिजली नव्हती आणि तेव्हापासूनच ममता यांना राष्ट्रीय राजाकरणाचे वेध लागायला सुरूवात झाली होती. महापालिका निवडणुकीतील यश पाहता मतदारांनी ममता यांना निर्विवाद कौल देऊन पुढच्या प्रवासाकरिता जणू शुभेच्छा दिल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे पश्चिम बंगालमध्ये धार्मिक तेढ वाढवण्याचा आरोप ममता यांच्यावर झाला. त्याचा पुनरूच्चार महापालिका निवडणुकीनिमित्त झाला आहे. मुळात असे आरोप होत असताना त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीत दिसायला हवा होता, तसे न झाल्यामुळे विरोधकांच्या आरोपांत तथ्य नव्हते असा दावा तृणमूल करू शकेल. स्थानिक निवडणुका आणि राज्य आणि राष्ट्रीय निवडणुका यांत मूलभूत फरक मतदारांच्या अपेक्षांवर बेतलेलाअसतो. धर्मांपेक्षा स्वच्छ, रूंद रस्ते, सुस्थितीत असलेली आरोग्य सेवा, मोकळी मैदाने, मुबलक पाणी-पुरवठा वगैरे यांना प्राधान्य दिले जात असते. त्यावर लक्ष केंद्रीत करून तृणमूलचे आव्हान परतवता आले असते. परंतु भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने राज्य आणि राष्ट्रीय विषय आणून तृणमूलच्या हातात सत्ता दिली. फोकस हल्ल्याचे तर हे लक्षण नव्हते.

राज्यात सत्ता असली की महापालिकेत ती पर्यायाने येईलच असा गोड गैरसमज मात्र करून घेता येणार नाही. मुंबई आणि राज्यातील महापालिका निवडणुकांचा विचार केला तर त्या जिंकण्यासाठी पक्षाचे मध्यवर्ती नेतृत्त्व खंबीर असावे लागते. भाजपाला राज्यात धूळ चारल्यावर ममता आत्मसंतुष्ट झाल्या नाहीत. त्यांची सत्तेची भूक शमली नाही. निवडणूक लहान-मोठी असा भेद त्यांनी केला नाही. मतदारांवर उत्साही नेते गारूड करीत असतात. मुंबईत कोणाचे गारूड चालते तयावर या महापालिकेचे भवितव्य अवलंबून असेल. ममता यांचा दांडगा उत्साह या यशामागे होता की त्यांची दांडगाई? ते काही असले तरी महापालिका आणि १६ विधानसभा मतदार संघांवर तृणमूलची सत्ता आहे. हे त्यांनी सिद्ध केले आहे.