चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा : भारतीय संघाला कांस्यपदक

जपानकडून उपांत्य लढतीत पराभवामुळे जेतेपद टिकवण्यात अपयशी ठरलेल्या भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे कांस्यपदक निसटू दिले नाही. बुधवारी झालेल्या तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाच्या लढतीत भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक लढतीत ४-३ असा विजय मिळवला.

राऊंड-रॉबिन पद्धतीने झालेल्या साखळी सामन्यांत अग्रेसर ठरलेल्या  भारताने मंगळवारी जपानकडून ३-५ अशा फरकाने पराभव पत्करल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध अपेक्षा उंचावल्या होत्या. भारताने या सामन्यात गोल करण्याच्या अनेक नामी संधी वाया घालवल्या. भारताला ११ पेनल्टी कॉर्नरपैकी फक्त दोनच गोलमध्ये रूपांतरण करता आले. मस्कतला झालेल्या मागील चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानच्या साथीने संयुक्त विजेतेपद मिळवले होते. यंदा या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

उपकर्णधार हरमनप्रीत सिंगने सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला भारताला गोलचे खाते उघडून दिले. मग सुमित (४५वे मिनिट), वरुण कुमार (५३वे  मिनिट) आणि आकाशदीप सिंग (५७वे मिनिट) यांनी गोल नोंदवले. पाकिस्तानकडून अफ्राझ (१०वे मिनिट), अब्दुला राणा (३३वे मिनिट) आणि अहमद नदीम (५७वे मिनिट) यांनी गोल केले.

भारताने पाकिस्तानच्या संरक्षण फळीवर जोरदार हल्ले केले आणि चार पेनल्टी कॉर्नर सलग मिळवले. यापैकी एकाचे त्यांना गोलमध्ये रूपांतर करता आले. पाकिस्तानने १०व्या मिनिटाला बरोबरी साधली.

तिसऱ्या सत्राच्या तिसऱ्या मिनिटाला अब्दुल राणाने दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरद्वारे पाकिस्तानच्या खात्यावर दुसरा गोल जमा केला. मग सुमितने भारताला बरोबरी साधून देणारा दुसरा गोल साकारला. चौथ्या सत्राच्या सुरुवातीला भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी एकाचे गोलरूपांतरण करीत वरुणने भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला तीन मिनिटे बाकी असताना ललितच्या पासवर आकाशदीपने रीव्हर्स हिटद्वारे भारताचा चौथा गोल नोंदवला. पण काही सेकंदांत अहमदने गोल करीत भारतावरील दडपण पुन्हा वाढवले.