एकीकडे पोलिसांच्या प्रतिमेला क्षणोक्षणी हादरे बसत असताना त्यांच्यापैकी एकाने पुस्तक लिहावे आणि त्याचे वर्णन करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी ‘सत्याचे प्रयोग’ असा करावा ही निश्चितच आनंददायी घटना आहे. वसई-विरारचे पोलिस आयुक्त आणि मुंबईत २००९ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्यावेळी लक्षणीय कामगिरी बजावणारे सदानंद दाते यांच्या ‘वर्दीतील माणसाच्या नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. बंग यांच्या हस्ते झाले. त्या समारंभात मांडले गेलेले विचार निश्चितच आशादायी आणि स्फुर्तीदायक ठरतील.
सध्या पोलीस आणि राजकारणी यांच्यात सडत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहाता श्री. दाते यांच्यासारखे कर्तव्यदक्ष आणि जीवावर उदार होऊन काम करणारे अधिकारी असतात यावर कदाचित सर्वसामान्यांचा विश्वासही बसणार नाही. परंतु श्री. दाते यांनी २६/११ च्या त्या काळरात्री दाखवलेले असामान्य सदस्य हे त्यांच्यावर झालेल्या संस्काराचे आणि जबाबदारीचे भान असणाऱ्या तत्कालीन पोलिसांनी दाखवून दिले होते. ही परंपरा खंडीत पडल्याचे वादग्रस्त प्रकार वाढीस लागल्याचा संदर्भ डॉ. बंग यांच्या भाषणात दिसतो. सत्तेच्या संगीत खुर्चीत राजकीय आदेश झुगारून लोकशाही टिकविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. हा विचार सध्या जे लाजीरवाणे प्रकरण सुरू आहे त्यावर भाष्य करणारे आहे. खाकी वर्दीचा आव आणि जनतेच्या मनात असावा असा आदर लयास चालला आहे काय, ही चिंता डॉ. बंग यांच्या वक्तव्यातून उमटते. पोलिसांनी सत्तेची भीती बाळगता कामा नये आणि राज्यघटनेचे ऐकण्याचे त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहायला हवे, असे विचारही मांडण्यात आले. डॉ. बंग यांनी व्यक्त केलेली अपेक्षा आदर्श व्यवस्थेचे लक्षण असून ही व्यवस्थाच आता दुबळी होत चालली आहे, हे वास्तव आहे. हफ्ते वसुल करणारे अधिकारी अतिरेक्यांना निधड्या छातीने सामोरे जातील काय हा प्रश्न डॉ. बंग यांनी विचारला नसला तरी तो जनतेच्या मनात डोकावत असतो. अशावेळी व्यवस्था सुधारण्यासाठी वारंवार टीकेचा मार्ग अवलंबणे योग्य ठरेल काय असा सवाल उपस्थित करून डॉ. बंग यांनी देशाला आज क्रांतिकारकांपेक्षा सुधारणावादी वृत्तीच्या माणसांची गरज आहे असे म्हटले. समाजात दबाव गट असावा, त्याची जरब असावी, सद्गुणी माणसांची दहशत असेल तर अनैतिकता आपोआप दोन पावले मागे सरकू लागते. चांगली माणसे भूमिका घेत नसल्यामुळे अपप्रवृत्तीचे फावते. हे सर्व थांबवायचे असेल तर सुधारणावाद्यांनी चांगले विचार आचरणात आणण्यासाठी कृती-कार्यक्रमही हाती घ्यायला हवा.