उपांत्य फेरीतील स्थान आधीच पक्के केलेल्या गतविजेत्या भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात जपानचा ६-० असा धुव्वा उडवला. या विजयासह मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने गुणतालिकेतील अग्रस्थान सुनिश्चित केले.
उपकर्णधार हरमनप्रीत सिंग (१० आणि ५३वे मिनिट), दिलप्रीत सिंग (२३वे मि.), जर्मनप्रीत सिंग (३४वे मि.), सुमित (४६वे मि.) आणि शमशेर सिंग (५४वे मि.) यांनी गोल करत भारताला सलग तिसरा विजय मिळवून दिला. भारताला सलामीच्या लढतीत कोरियाने २-२ बरोबरीत रोखले होते. त्यानंतर मात्र भारताने यजमान बांगलादेश, पाकिस्तान आणि जपान यांना धूळ चारली.
आशियाई क्रीडा स्पर्धा विजेत्या जपानला या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही. भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व प्रस्थापित करताना जपानच्या बचाव फळीवर दडपण टाकले. पहिल्या सहा मिनिटांतच भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, त्यांना गोल नोंदवता आला नाही. १० व्या मिनिटाला भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि या वेळी हरमनप्रीतने कोणतीही चूक न करता संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. २३व्या मिनिटाला मनदीप सिंग आणि शिलानंद लाक्राच्या चांगल्या खेळानंतर दिलप्रीतने गोल करत भारताची आघाडी दुप्पट केली.
मध्यंतरानंतर जपानने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला; परंतु याचा भारताला फायदा झाला. भारताने भक्कम बचाव करतानाच जोरदार प्रतिहल्ला केला. तिसऱ्या सत्रात जर्मनप्रीत, तर चौथ्या सत्रात सुमित, हरमनप्रीत आणि शमशेर यांनी गोल केल्यामुळे भारताने हा सामना ६-० असा जिंकला. भारताच्या या विजयात गोलरक्षक सूरज करकेरानेही महत्त्वाचे योगदान दिले.
साखळी फेरीत अपराजित
जपानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच उपांत्य फेरीतील स्थानाची निश्चिती करणाऱ्या भारतीय संघाने साखळी फेरीत अपराजित राहताना सर्वाधिक १० गुणांची कमाई केली. रविवारी झालेल्या सामन्याआधी भारताचे सात, तर जपानचे पाच गुण होते. त्यामुळे विजयासह तीन गुण पटकावत अव्वल स्थान मिळवण्याची दोन्ही संघांना संधी होती. भारताने उत्कृष्ट खेळ करताना चार सामन्यांतील तिसऱ्या विजयाची नोंद केली.