बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण मुख्य भूमिकेत असणारा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे ’83.’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला अडकला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
’83’ चित्रपटावर दुबईमधील एक व्यक्तीने कट रचून फसवणुक केल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील प्रथम न्यायदंडाधिकारी कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये 83 चित्रपटाचे सर्व निर्माते आणि दीपिका पादूकोणवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कलम ४०५, ४०६, ४१५, ४१८, ४२० आणि १२० ब अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये दीपिका शिवाय साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान यांचे देखील नाव आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की हैदराबादमध्ये चित्रपटाशी संबंधीत काही बोलणे झाले होते. तसेच विब्री मीडियाशी चित्रपटाच्या इनवेस्टमेंट विषयी देखील बोलणे झाले होते. जवळपास १६ कोटी रुपये यामध्ये त्या व्यक्तीने गुंतवले होते. पण निर्मात्यांनी त्या व्यक्तीला कोणतीही माहिती न देता या सर्वातून काढल्यामुळे तक्रार केली आहे.
तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या वकीलांनी माहिती दिली आहे. ‘हे सत्य आहे की फसवणूक आणि कट रचल्या प्रकरणी 83 चित्रपटाच्या निर्मांत्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आम्ही सुरुवातीला आपापसात हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण चित्रपटाच्या निर्मात्यांना आमचे म्हणणे ऐकण्यात रस नसल्याचे मला कळाले. त्यामुळे आम्ही कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
’83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.