कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात १९ रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार असल्याने खड्ड्यातून प्रवास करण्याचा वर्षानुवर्षांचा मनःस्ताप संपुष्टात येईल अशी आशा करायला हरकत नाही. खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे एमएमआरडीएने हा निधी उपलब्ध करून देण्याचे ठरवले असल्याने शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीवर डोळा ठेऊन ही कामे करीत असल्याची ओरड सुरू झाली आहे. ते काही असले तरी नागरीकांना पुढील पावसाळ्यापूर्वी चांगले रस्ते उपलब्ध होतील हे विशेष. आरोप-प्रत्यारोपांचे गतीरोधक विलंबास कारणीभूत ठरू नयेत म्हणजे मिळवले.
रस्ते हे महापालिकांच्या कामाचे दर्शक असतात. महापालिकेची कार्यक्षमता ढोबळ मानाने जनता त्यावरून ठरवत असते. दळणवळण ही आधुनिक काळाची प्राथमिक गरज असल्यामुळे रस्ते हा जिव्हाळ्याचा विषय ठरत असतो. ज्या प्रभागात रस्ते सुस्थितीत असतात त्या नगरसेवकाबद्दल जनता भर-भरून बोलत असते. स्वच्छ, रूंद, कचरा आणि अतिक्रमणमुक्त रस्ते असणे दुर्मिळ बनत चालले असताना कडोंमपा १९ रस्ते तयार करणार आहे आणि किमान तेवढे नगरसेवक तरी या रस्त्यांवरून उजळ माथ्याने फिरू शकणार आहेत.
कोरोना काळात सरकारचे उत्पन्न घटत असताना इतकी मोठी तरतुद उपलब्ध होणे हे स्वागतार्ह आहे. रस्ते बनवणाऱ्या ठेकेदार आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यानी त्याचे भान ठेवायला हवे. कामाचा दर्जा राखला जायला हवा, अनेकदा त्याकडे काणाडोळा होतो. रस्त्यांवर खड्डे पडू लागतात आणि खर्च झालेला पैसे पाण्यात गेल्यासारखे वाटते. ही खबरदारी स्थानिक नगरसेवकांनी घ्यायला हवी.
दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा की, रस्त्यांचे काम हाती घेण्यापूर्वी भूमीगत सेवा-वाहिन्यांचे नियोजन होणे गरजेचे आहे. वीज मंडळ असो की टेलिफोन वा गॅस प्राधिकरण यांचा महापालिकेशी समन्वय असायला हवा. अनेकदा रस्ता तयार झाल्यावर खड्डे पडून दुरूस्तीचे काम सुरू केले जाते. त्यामुळे रस्ते उखडले जातात आणि पदरी निराशा पडते.
खा. शिंदे यांना आम्ही आणखी एक सूचना करू इच्छितो, प्रवासी जनतेला सेवा देणाऱ्या केडीएमटीची स्थिती भलतीच नाजूक आहे. ३२१ कोटी रुपयांपैकी किमान दहा टक्के रक्कम परिवहन सेवेची ताकद वाढवण्यासाठी खर्च झाली तरच या रस्त्यांचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी होऊ शकेल. नवीन गुळगुळीत रस्त्यांवर खाजगी वाहनांपेक्षा सार्वजनिक उपक्रमाच्या बसेस धावणे उचित ठरेल. तरच कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक व्यापक स्वरूपात नागरिकांना मिळेल. अन्यथा चकचकीत रस्त्यांवर खाजगी वाहनेच पळत राहतील आणि रस्ते नवे, पण वाहतूक कोंडी ,प्रदूषण या जुन्याच समस्यांचा मुकाबला करण्याची वेळ जनतेवर यायची!