भाजपाचे आस्ते कदम?

राजस्थान भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सरकारला मुदत पूर्ण होईपर्यंत खाली खेचणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीलाही सुटकेचा निःश्वास सोडायला हरकत नाही. राजस्थान सरकारची मुदत २०२३ पर्यंत आहे आणि तोवर भाजपा ते खाली खेचण्याचा प्रयत्न करणार नाही, असे गृहमंत्र्यांनी जाहीरपणे घोषित केले आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसची राजवट असून जनताच त्यांना आगामी निवडणुकीत घरी बसवेल असा आत्मविश्वास श्री. शाह यांनी व्यक्त केला आहे.
राजकारण्यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका व्यक्त होत असताना श्री. शाह यांच्या या भूमिकेवर किती विश्वास ठेवायचा हे काँग्रेसला ठरवावे लागेल. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि असंतुष्ट गटाचे सचिन पायलट यांच्यात विस्तव जात नाही. अलिकडे त्यांच्यात दिलजमाई झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे भाजपाला तेथील सरकार खाली खेचणे तुर्तास अशक्य वाटल्यामुळेच श्री. शाह यांनी मनाचा ‘मोठेपणा’ दाखवला असावा, असा एक तर्क काढला जाऊ शकतो.
किंवा असेही असू शकते की, एकीकडे पडद्यामागून कारवाया न करण्याचा दिलासा देत सत्तारूढ पक्षाला गाफिल ठेऊन हळूच सत्तांतर घडवून आणण्याचे शाह यांचे मनसुबे असतील. २०२३ उजाडायला अजून वर्षाचा अवकाश आहे आणि सत्तेवर पाणी सोडण्यासाठी बऱ्यापैकी मोठा काळ असल्यामुळे शाह यांच्या भूमिकेबद्दल काँग्रेस सतर्क राहण्याचीच अधिक चिन्ह आहेत.
राजस्थानमधील गृहमंत्र्यांच्या भूमिकेचा महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंध जोडला तर आगामी काळात भाजपा आस्ते कदम जाईल,असे वाटते. विरोधी पक्ष म्हणून असलेल्या आक्रमकपणाला आवर घातला जाईल. जनतेला सतत विरोधी सूर आवडत नसतो. विरोधी पक्ष सत्तारूढ पक्षाच्या उणिवा दाखवत असेल तर या उणिवांवर मात कशी करता येईल हेही त्यांनी कृतीतून दाखवायचे असते. जनतेच्या अशा-आकांक्षांना फक्त टीकेच्या परिघात ठेवणे हे चांगल्या विरोधी पक्षाचे लक्षण नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमा बिघडत रहाते. त्याला उथळ आणि सवंगपणाचा वास येऊ लागतो. राजकारणातील हा दुर्गंधी मतदारांना पाठ फिरविण्यास प्रवृत्त करीत असते. दुसरे म्हणजे विरोधकांना आरोप करण्यात आणि आंदोलने करण्यात बरीच शक्ती खर्च करावी लागते. ही शक्ती जनभावना मतांमध्ये परिवर्तित होण्यात उपयोगी पडत नाही. श्री. अमित शाह यांनी राजस्थानमध्ये घेतलेल्या ‘सामंजस्य’ भूमिकेमागे हा विचार असण्याची शक्यता आहे.
सत्तारूढ पक्षांना काम करण्याची संधी दिली तरच त्यांच्या हातून चुका होतील, हा दूरगामी विचार भाजपाच्या नविन व्युहरचनेला भाग असू शकतो.