रिक्षा दरवाढ विचारपूर्वक हवी

कल्याणमध्ये सार्वजनिक बस वाहतुकीचा बोजवारा उडाला असताना सर्वसामान्य नागरिक रिक्षावर अवलंबून असतो. त्यातही ‘शेअर-रिक्षा’ला पसंती देऊन प्रवासी दोन पैसे वाचवण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र प्रादेशिक परिवहन खात्याने प्रसिद्ध केलेल्या हंगामी दरपत्रकात अपेक्षित दोन रुपयांची वाढ तब्बल सात ते आठ रुपये झाल्यामुळे प्रवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. हे दरपत्रक हंगामी असून नागरिकांच्या हरकती वा सूचना मागवून अंतिम दर ठरवण्यात येईल असे आरटीओकडून सांगण्यात येत असले तरी एकदा वाढवलेले दर (भले मग ते हंगामी असले तरी) कमी होण्याची प्रथा आपल्या देशात नसल्याने प्रवाशांना आगामी काळात वाढीव दरानेच भाडे भरावे लागण्याची भीती आहे.

दैनंदिन दळणवळण हा शहरातील चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय. महिन्याला मिळणाऱ्या कमाईतील एक मोठी रक्कम त्यावर खर्च होत असते.आधीच पगारकपात आणि बेरोजगारीची टांगती तलवार अशा दुहेरी संकटात सापडलेल्या नागरिकांना प्रवास खर्चात दिलासा मिळवा ही अपेक्षा होती. ती पूर्ण होण्याची शक्यता धुसर झाली आहे. नाही म्हणायला पाचशेच्या वर नागरिकांनी रिक्षा भाड्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यांचा विचार हंगामी दरपत्रक काढताना केला गेला होता काय? शेअर रिक्षाचे दर ९० टक्क्यांनी वाढले आहे. त्याचे आरटीओ कसे काय समर्थन करणार आहे? पूर्वी पेट्रोलवर चालणार्‍या रिक्षा आता गॅसवर चालत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रति कि.मी. खर्च कमी व्हावा ही अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे झाले नाहीच. सर्वसामान्य जनतेचा हा आशावाद धुळीस मिळण्याची शकयता आहे.
आर्थिक मंदीची झळ रिक्षाचालकांनाही बसली आहे. त्यांनी पोटाला चिमटा काढून सेवा द्यावी, ही अपेक्षा नाही. परंतु दरवाढ करताना आम जनतेचा सहानुभूतीपूर्वक विचार होणे गरजेचे आहे. एकीकडे महापालिकेची परिवहन सेवा प्रवाशांना न्याय देऊ शकत नाही म्हणून अवाजवी रिक्षा भाडे आकारून त्यांच्यावर अन्याय करणे किती संयुक्तिक ठरेल?

दैनंदिन प्रवास ही शहरातील नागरिकांसाठी प्राथमिक गरजांपैकी एक बनली आहे. प्रवासी कामावर गेले तर अर्थचक्र फिरू लागणार आहे. उत्पादन वाढले तर रोजगार वाढतील. लोकांच्या हातात चार पैसे येतील. त्यातून त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. दर वाजवी असले तर प्रवाशांचा ओघ नक्की वाढू शकतो. तो वाढला तर रिक्षाचालकांच्या हाती चार पैसे येतील आणि त्यांची स्थिती सुधारेल. प्रश्न एवढाच आहे की, दरवाढ करताना हा साधक-बाधक विचार व्हावा. जेरीस झालेल्या प्रवाशांना आपण आणखी नडता कामा नये.