ममतांचा नवा खेळ

संयुक्त पुरोगामी आघाडी आहे तरी कुठे हा ममता बॅनरजी यांनी विचारलेला प्रश्न काँग्रेसला हिणवण्यासाठी होता की त्याबाबत त्या पक्षाला बऱ्या बोलावे या नाही तर जा,असे ठणकावण्याचा प्रयत्न होता, हे संबंधितांना ठरवावे लागेल. २०१४ साली ‘संपुआ’ कडून सत्ता खेचून आणणार्‍या राष्ट्रीय लोकशाही आघाउी (रालोआ) या भाजपा प्रणित गटबंधनास २०२४ साली धूळ चारण्याच्या उद्देशाने ममताबाईंची मोर्चेबांधणी सुरू झालेली दिसते. आपल्या राज्यात केंद्र सरकार चालवणार्‍या भाजपाला चारही मुंड्या चित केल्याने तयांना नियोजित तिसरी आघाडी स्थापन करण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो. ‘करून दाखवलं’ असे म्हणण्याचा अधिकार काँग्रेसने गमावला असल्याने ममताबाईंचे ऐकण्याशिवाय भाजपा-विरोधी सर्व पक्षांना गत्यंतर नाही. अर्थात अशा तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे येईलच असेही नाही. त्यामुळे तुर्तास भाजपा ममताबाईंच्या वल्गनांची फारशी दखल घेईल, असे वाटत नाही.
भाजपाविरोधात समविचारी पक्ष एकत्र आले तरच एक दखलपात्र आव्हान उभे राहू शकते. परंतु, केवळ भाजपाला विरोध हा एक कलमी कार्यक्रम असून चालणार नाही. त्यासाठी समान किमान कार्यक्रमाची रुपरेषा तयार करावी लागेल. ममता यांचे नेतृत्व मान्य होणे हा पुढचा भाग झाला. त्याआधी भाजपाच्या धोरणांना विरोध करण्यासाठी एकमुखी पर्याय निवडायला हवा. हे सार्वमत मिळवणे ‘संपुआ’तील घटक पक्षांच्या भिन्न ध्येयधोरणांमुळे अशक्य होत असते. भाजपाला हे चांगले ठाऊक असल्यामुळे ममताबाईंच्या या हालचालींची नोंद जरी घेतली गेली तरी गंभीर दखल घेतली जाईल असे नाही.
ममता यांच्या भूमिकेबद्दल बोलताना श्री. शरद पवार यांनी मात्र काँग्रेसला वगळून आघाडी करण्याचा विचार नाही असे स्पष्ट केले. श्री. पवार हे सर्वसमावेशकतेचे पुरस्कर्ते आहेत. परंतु खुद्द काँग्रेस हाय-कमांडला ‘संपुआ’ चे स्वामीत्व आपल्याखेरीज कोणाकडे जावे, असे वाटत नाही. त्यांना ममता यांनी घेतलेला पुढाकार खचितच रूचणार नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला धूळ चारणार्‍या ममताबाईंच्या काँग्रेसची धूळधाण केली होती. हे नाकारून चालणार नाही. ‘संपुआ’ चा प्रयोग ममताबाईंच्या ‘होम-ग्राउंड’ वर सपशेल फसणार आहे. पवारांना भले काँग्रेस हवी असली तरी ममताजींचे मत वेगळे दिसते. एकीकडे या घटना घडत असताना काँग्रेसमधील असंतुष्ट गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला फार यश लाभणार नाही असे भाकित करून ‘संपुआ’ मधील काँग्रेसच्या असण्या-नसण्याच्या शक्यतेला आणि उपयुक्ततेला सुरूंग लावला आहे. ‘संपुआ’चे अस्तित्व उत्तर प्रदेशसह होणार्‍या चार राज्यांतील पुढील वर्षात होणा-या विधानसभा निवडणुकांपूर्वी व्हायला हवे. भाजपावाले मात्र ममतांच्या योजनेला सुरूंग लावण्यात वेळ वाया घालवतील असे वाटत नाही. त्यांना संयुक्त आव्हानाची भीती तर सोडाच, पण तसे काही होणार याची खात्री वाटत आहे. ‘खेल होबे’ असे म्हणत विधानसभा निवडणूक खिशात घालणार्‍या ममतांनी नव्या खेळास प्रांरभ केलेला दिसतो. त्यांचा पंतप्रधानपदावर डोळा असेल तर काँग्रेसला तरी कसे चालेल? पवारांचे राष्ट्रपतीपदाचे मेतकूट जमले तर ममतादीदींचा गोल होण्यापूर्वी पेनल्टी कॉर्नरला सामोरे जावे लागेल ते वेगळेच.