कल्याण : वडवली परिसरातील निर्मल लाईफ स्टाईल परिसरात दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळ सापाला विवेक भगत या तरुणाने जीवनदान देत वन खात्याकडे सुपूर्द केले.
मांडूळ सापाची मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव असून तो बिनविषारी आहे. हा साप जास्त करून वाळूमध्ये राहतो. अॅनाकोंडाप्रमाणे या सापाचे डोळे डोक्यावर असतात. शिकारीसाठी हा साप वाळूमध्ये स्वत:ला लपवतो आणि केवळ त्याचं डोकं वर राहतं. शिकार जवळ येताच त्यावर हल्ला करतो. परदेशात अनेकजण हा साप पाळतात सुद्धा. सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.
मांडूळ या सापाचा वापर नशेचे पदार्थ तयार करण्यासाठी, महागडे परफ्यूम तयार करण्यासाठी आणि कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात केला जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात याची मोठी किंमत मिळत असल्याने यांची तस्करी केली जाते असे समजते तर अंधश्रद्धेपोटी गुप्त धनाच्या शोधात असणारे काळ्या जादुच्यासाठी मांडुळचा वापर करत असल्याने मांडूळाला लाखोच्या घरात किंमत मिळत असल्याने काही जण याच्या शोधात असतात. वडवली येथील निर्मल लाईफ स्टाईल परिसरात मांडुळ दुर्मिळ प्रजातीचा सापाला सोमवारी सकाळच्या सुमारास विवेक भगत यांनी जीवनदान देत वनखात्याकडे नैसर्गिक आधिवासात सोडण्यासाठी सुपर्द केले.