कोणाच्या खांद्यावर, कोणाचा हात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवलेले छायाचित्र सध्या भलतेच चर्चेत आहे. भले एका पक्षाचे दोघे असले आणि पक्षाचे कार्यकर्ते म्हणुन त्यांचा जुना दोस्ताना असला तरी तो असा जाहीरपणे प्रदर्शित करणे योग्य होते काय, असा सवाल चर्चाविश्‍वात गाजत आहे. काही झाले तरी मोदी हे पंतप्रधान आहेत आणि राजकीय शिष्टाचाराला (प्रोटोकोल) धरून असे खांद्यावर हात ठेवणे योग्य नाही असे बोलले जाऊ लागले आहे. समाजमाध्यमांमुळे अशा छायाचित्रांना आणि त्यावरून होणार्‍या चर्चेला महत्व प्राप्त होते. योगी आदित्यनाथ यांनी छायाचित्र पोस्ट करण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणजे मुख्यमंत्रीही या इंटरनेटच्या मोहापासून स्वत:ला अलिप्त ठेऊ शकत नाहीत, हे स्पष्ट होते. निवडणुकीपूर्वी अशा फोटोची चर्चा होणे, योगींच्या पथ्यावरच पडणारे आहे. योगींनी फोटोबरोबर उधृत केलेल्या काव्यपंक्तीमुळे तो अधिक लक्षात आला. :हम निकल पडे है प्रण करके, जिद है एक सूर्य उगाना है, अंबर से उंचा जाना है, एक भारत नया बनाना है!
उत्तर प्रदेशात पुढील काही महिन्यांत निवडणुका असल्यामुळे या छायाचित्राचे असंख्य राजकीय अन्वायर्थ काढले जाऊ लागले आहेत. भावी पंतप्रधान म्हणुन योगींचे नाव अधूनमधून घेतले जात असताना मोदींनी भले डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला नसला तरी खांद्यावर हात ठेऊन सुतोवाच तर केले नाहीना?
देशातील राजकारणाची दिशा ठरवणारे राज्य म्हणुन उत्तर प्रदेशकडे नेहमी पाहिले जात असते. या राज्यातील खासदारांची संख्या देशातील सत्तेचे पारडे जड करीत असते. त्यामुळे 2024 मध्ये मोदींना हॅटट्रिक साधायची असेल तर विधानसभेत योगींच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे ओघाने आलेच. खांद्यावर ठेवलेला हात हा त्याचा पुरावा!
उत्तर प्रदेश एकदा का खिशात आले की दिल्लीचे तख्त आपोआप हस्तगत होते. त्यामुळे हे दोन नेते नेमके 2022 च्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलत असतील की 2024 च्या लोकसभेची व्युहरचना ठरवत असावेत? शक्यता अशी आहे की हे दोन्ही विषय ते बोलले असावेत कारण ते एकमेकांवर अवलंबून आहेत. पुरक आहेत,
मोदींचे योगींवर प्रेम असल्याचे हे प्रतिक मानायचे की 2024 मध्ये होणार्‍या उलथापालथीचे द्योतक? मोदींनी योगींच्या खांद्यावर हात ठेवण्याला म्हणुनच महत्व प्राप्त होते. विरोधी पक्षातील त्याची दखल घेतली नाही तरच नवल. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या फोटोवर त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. ती अर्थातच खूप बोलकी आहे. ते म्हणतात: दुनिया के खातिर, सियासत में कभी यूं भी करना पडता है, बेमन से कंधे पर रख हाथ, कुछ कदम संग चलना पडता है!
राजकारणात कोण कोणाच्या खांद्यावर हात ठेवतो याला म्हणुनच वेगळा अर्थ प्राप्त होतो. बाकी हा नियम तुम्हा-आम्हाला लागू नसतो हे बरे झाले. आपण ना कोणाला गळाभेट देतो की खांद्यावर हात ठेवतो. तसे केले तरी पाठीत कोणी वार करीत नसतो की केसाने गळा कापीत नसतो. आपली म्हणुनच चर्चा नसते!