कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक (३१ चेंडूंत ५६ धावा) आणि अक्षर पटेलसह (३ गडी) गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७३ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.
कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर झालेल्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात यजमान भारताने दिलेल्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १७.२ षटकांत १११ धावांतच आटोपला. त्यामुळे रोहित आणि राहुल द्रविड या नव्या कर्णधार-प्रशिक्षक पर्वाचीही मालिका विजयाने सुरुवात झाली. न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिलने एकाकी झुंज देताना ३६ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली. भारताकडून डावखुरा फिरकीपटू अक्षरने अवघ्या नऊ धावांत तीन गडी बाद केले. त्याला हर्षल पटेलने दोन, तर दीपक चहर, यजुर्वेंद्र चहल आणि वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी एक बळी घेत उत्तम साथ दिली.
त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकांत ७ बाद १८४ अशी धावसंख्या उभारली. के. एल. राहुलच्या जागी सलामीला आलेल्या इशान किशन (२९) आणि रोहित यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करत ६.२ षटकांत ६९ धावांची सलामी दिली. रोहितने ५६ धावांची खेळी करताना सलग दुसरे अर्धशतक नोंदवले. त्यानंतर मधल्या फळीतील श्रेयस अय्यर (२५), वेंकटेश (२०) आणि चहर (नाबाद २१) यांच्या योगदानामुळे भारताने १८० धावांचा टप्पा ओलांडला.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ७ बाद १८४ (रोहित शर्मा ५६, इशान किशन २९; मिचेल सँटनर ३/२७) विजयी वि. न्यूझीलंड : १७.२ षटकांत सर्वबाद १११ (मार्टिन गप्टिल ५१; अक्षर पटेल ३/९, हर्षल पटेल २/२६)
* सामनावीर : अक्षर पटेल
* मालिकावीर : रोहित शर्मा
८-० न्यूझीलंडविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्याची ही भारताची सलग दुसरी वेळ ठरली. मागील वर्षी भारताने न्यूझीलंडमध्ये झालेली पाच सामन्यांची मालिका ५-० अशी जिंकली होती. त्यानंतर आता भारताने पुन्हा ३-० असे निर्भेळ यश मिळवले.