खोणी गावातील कॉम्प्लेक्समध्ये साडेचार लाखांची घरफोडी

डोंबिवली : खोणी गावठाण हद्दीतील आलिशान कॉम्प्लेक्समध्ये घुसून चोरट्यांनी तब्बल चार लाख 49 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सुरक्षा रक्षकांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही या कॉम्प्लेक्समध्ये इतकी मोठी घरफोडी झाली कशी, असा सवाल या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात या सोसायटीच्या सी विंगमध्ये राहणारे अंकेत झा (२७) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तशी तक्रार दाखल केली आहे. झा कुटुंबीय ९ ऑक्टोबर रोजी नवरात्रौत्सवानिमित्ताने मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरला मूळगावी गेले होते. हे कुटुंब २०ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घरी परतले तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. तर बेडरूममध्ये जाऊन बघितले असता लाकडी कपाटासह त्याचे लॉकर उघडे दिसले. तसेच शौचालयाच्या खिडकीची लोखंडी ग्रील कापलेली दिसली. चोरट्यांनी या घरातून मंगळसूत्र, अंगठ्या, हार, ब्रेसलेट, मोबाईलसह चेकवर स्वाक्षऱ्या केलेले बुकदेखील चोरून नेल्याचे अंकेत झा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.