इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : कोलकाताची अंतिम फेरीत धडक

शारजा : गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यानंतर वेंकटेश अय्यर (५५) आणि शुभमन गिल (४६) यांच्या दमदार सलामीमुळे कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील ‘क्वालिफायर-२’च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर तीन गडी आणि एक चेंडू राखून विजय मिळवला. त्यामुळे दिल्लीचे पहिल्यांदा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा भंगले.

दिल्लीने दिलेले १३६ धावांचे लक्ष्य कोलकाताने १९.५ षटकांत गाठत तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. डावखुऱ्या अय्यरने (५५) सुरुवातीपासून दिल्लीच्या गोलंदाजांवर दडपण टाकले, तर गिलने (४६) त्याला उत्तम साथ दिली.  तसेच नितीश राणा (१३) झटपट बाद झाला. यानंतर चार षटकांत १३ धावांची आवश्यकता असताना कोलकाताने सात धावांत सहा बळी गमावले. मात्र, अखेरच्या षटकात दोन चेंडूंत सहा धावांची गरज असताना राहुल त्रिपाठीने (नाबाद १२) षटकार मारत कोलकाताला विजय मिळवून दिला. आता शुक्रवारी जेतेपदासाठी कोलकातापुढे चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असेल.

तत्पूर्वी, दिल्लीला २० षटकांत ५ बाद १३५ धावाच करता आल्या. पृथ्वी शॉला (१८) फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने पायचीत केले. मग शिखर धवन (३६) आणि मार्कस स्टोइनिसला (१८) वेगाने धावा करण्यात अपयश आले. अखेरच्या षटकांत श्रेयस अय्यर (नाबाद ३०) आणि शिमरॉन हेटमायर (१७) यांनी काही चांगले फटके मारले.