जामिनासाठी मदत न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या

हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली गुजरातमधून अटक

कल्याण : जामिनासाठी मदत न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या केल्याची घटना कल्याणमधील बारावे येथे घडली असून हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी  गुजरातमधील गोधरामधून अटक केली आहे. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शंका मृताच्या कुटुंबाने व्यक्त केली असून पोलिसांनी योग्य तपास करून न्याय देण्याची मागणी कुटुंबाने पोलिसांकडे केली आहे.

पोलिसांच्या मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमधील बारावे गावात राहणाऱ्या मुकेश रमेश देसाईकर  व शेरखान मुदसिंग खान हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र असून दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने गेल्या काही दिवसापूर्वी दोघे शस्त्र ठेवण्याच्या गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते. यावेळेस मुकेशने आपला जामीन त्वरित मिळवत जामिनावर सुटका करून घेतली. मात्र  शेरखानला जामीनवर सुटका करण्यासाठी कोणतीच मदत केली नाही. अखेर शेरखानने स्वतः जामिनावर स्वतःची सुटका करून घेतली. मात्र बाहेर आल्यानंतर त्यांनी मुकेश बरोबर आपली मैत्री  तोडून टाकली तरीही मुकेश त्याला वारंवार बोलून मारहाण करत त्रास देत असे.

अखेर या त्रासाला कंटाळून शेरखानने  एक प्लॅन करत ७ ऑक्टोबर रोजी धारधार हत्याराने रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुकेशची हत्या केली. हत्येनंतर त्याने आपला मोबाईल आपल्या जवळ न बाळगता तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन वेगवेगळ्या टीम करून शेरखान चा शोध सुरू केला. अखेर गुप्तचरांची  माहिती व पोलिसांच्या टेक्निकल बाबींमळे शेरखानला गुजरातमधील गोधरा मधून  गजाआड केले व आपला पुढचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान या हत्येमध्ये आणखी काही लोकांचा हात असून प्लॅनिंग करत ही हत्या केल्याचा आरोप मुकेशच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी इतर बाबी तपासून या संबंधित असलेल्या गुन्हेगारांना कठोर कारवाई करावी अशी मागणी मुकेशचे कुटुंबीय करीत आहेत.