कडोंमपाच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
कल्याण : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचा दावा करणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत व्हॅली येथील प्रसुतीगृहात प्रसुतीसाठी आलेल्या एका गरोदर महिलेला काही वेळ बसून ठेवले. नंतर तिची फाइल बघून पेशंटची शुगर वाढली असून यांच्याकडे फिजिशीयन आणि इतर अत्याधुनिक उपकरणे नसल्याने येथे प्रसूती होणार. असे उत्तर डॉक्टरनी महिलेच्या नातेवाईकांना देत रुग्णालय प्रशासनाने हाकलून लावण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वसंत व्हॅली येथे प्रसूतिगृह आहे. या प्रसूती गृहामध्ये शुक्रवारी सकाळी दूध नाका परिसरामध्ये राहणारी इरफाना शेख या महिलेला सकाळी ८ वा. प्रसूतीसाठी आणले असता तिला प्रसूतीसाठी दाखल न करताच तिला रुग्णालयाच्या बाहेरच बसून ठेवण्यात आले. तुमची शुगर वाढलेली आहे आमच्याकडे फिजिशियन डॉक्टर नाहीत आयसीयु नाही असे थातुरमातुर कारण सांगून या गरोदर महिलेला सायन हॉस्पिटलमध्ये जाण्याचा अजब सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आला.
दुर्दैव महणजे पेशंट रुग्णालयात नेण्यासाठी आणि बाहेर आणीसाठी स्ट्रेचर अथवा व्हीलचेअर देण्यात आले नाही. अशा बिकट परिस्थितीत महिला पेशंटला चालत घेऊन जावे लागले असल्याचे महिलेचा भाऊ सोएब यांनी सांगितले. महिलेच्या नातेवाईकांनी ३० सप्टेंबरला तपासणीसाठी या रुग्णालयात घेऊन आले होते. त्यावेळी सोनोग्राफी केली असता ती नॉर्मल सांगितली. त्यावेळी शुगरची कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. ८ ऑक्टोबरला प्रसुतीसाठी घेऊन या इतकेच सांगितले. आज घेऊन आल्यानंतर येथील रुग्णालयातील प्रशासनाकडुन माहिलेची तपासणी न करता येथून घेऊन जा असे सांगण्यात आले असे महिलेचा भाऊ सोएब याने सांगितले.
सोएब याने रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर ऐकत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांना संपर्क साधून सहकार्य करण्यास सांगितले. भोईर यांनी याबाबत जाब विचारताच महिलेला रुग्णालयात घेण्यात आले. महिलेची सीजरींग करावे लागणार असल्याचे डॉक्टरने सांगितले. मात्र माहिलेची शुगर लेवल वाढल्याने सिजेरीग येथे करणे शक्य नाही. त्यासाठी अत्यावश्यक उपकरणे लागणार ती उपकरणे पालिकेच्या रुग्णालयात नसल्याने पेशंट सायन रुग्णालयात घेऊन जा असे प्रसूतीगृहतील डॉक्टरांनी सांगितले असल्याचे महिलेचा भाऊ सोएबने सांगितले.
अखेर महिलेला कल्याणतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिची सुखरूप प्रसूती झाली. मात्र अजुनही कल्याण डोंबिवलीची रुग्णसेवा कुचकामी ठरत असल्याचे आज दिसून आले आहे. दरम्यान याबाबत महापलिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांना विचारले असता याबाबत माहिती घेते असे सांगितले.