पालघर निवडणुकीचा बोध

पालघर जिल्हा परिषदेतील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा पराभव हा धक्कादायक मानला जात आहे. या निवडणुकीला केवळ जय-पराजय या मर्यादित आकृतीबंधात न अडकवता राजकीय पक्षांत सर्रास होत असणार्‍या पक्षांतरांकडे मतदार कसे पहातात याचा विचार व्हावा असे वाटते.
खा. गावित यांनी दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. मुळचे काँग्रेसवासी असलेल्या खा. गावित यांनी भाजपात आणि मग शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपाचे चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यावर सेनेेने त्यांच्या मुलास निवडणुकीत उभे केले. भाजपाने आपल्या एका सच्च्या कार्यकर्त्याच्या कुटुंबावर का अन्याय केला, हे कळायला मार्ग नाही. परंतु पक्षांतरांच्या या परिणामाकडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांना विजय मिळाला पण उमेदवार आयात करून. सेनेला पराभव चाखावा लागला. परंतु आता ना सेनेला, ना भाजपाला पक्षांतरावर बोलण्याचा नैतिक अधिकार राहिला आहे. वनगा कुटुंबियांना न्याय देण्याचा दावा भले सेनेने तेव्हा केला होता. परंतु सहानुभूतीची लाट निर्माण करण्यात ते कमी पडले. हे कटू सत्य होते. गावितांनी परिस्थितीचा फायदा उठवला. तो त्यांच्या राजकारणाचा भाग झाला. परंतु सेनेत असंतोष पेरला गेला.
कालांतराने सेना-भाजपाची युती झाली. जागा वाटपात पालघरची जागा सेनेकडे गेली. गावित यांनी भाजपातून सेनेत प्रवेश केला. आणि ते जिंकलेही. थोडक्यात गावित हे नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हे सेना, भाजपा आणि काँग्रेस सांगू शकणार नाही. ते सैनिकांनी दाखवून दिले.
आता या पार्श्‍वभूमीवर रोहित गावित यांच्या वणई गटात पराभव भाजपाकडून झाला आहे. म्हणजे शिवसेनेला उमेदवार आयात करणे महाग पडले असा निष्कर्ष काढावा लागेल. मतदारांना आणि कार्यकर्त्यांना वारंवार होणारी पक्षांतरे कबूल नाहीत असाही एक निष्कर्ष काढता येऊ शकेल.
दुसरा निष्कर्ष लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा प्रभाव दिसेल. आगामी निवडणुका महाविकास आघाडी तर्फे लढवल्या गेल्या तर घटक पक्षांतील असंख्य इच्छुकांना आपली महत्वाकांक्षा विसर्जित करावी लागेल. पाच वर्षांनी नशिब आजमावण्यासाठी थांबणे परवडणारे नसते. अशी मंडळी मग दलबदल करणार. बंडखोरांचे प्रमाण वाढणार. अपक्षही रिंगणात उतरणार, अशा वेळी मतदार नेमके कोणाच्या बाजूने उभे राहतील, हे सांगणे कठीण होऊन बसेल. पक्षाच्या निष्ठावंतांवर अन्याय केला तर काय होते हे पालघर पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे. बेरजेचे राजकारण असे गोंडस नाव देऊन स्व:ताची सोय पहाणार्‍या समस्त नेतेमंडळींना यातून बोध घ्यावा लागेल.