तसे पाहिला गेले तर अभिनेते शाहरूख खान यांचे चिरंजीव आर्यन यांना अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक करणे या स्तंभात स्थान देण्याइतका विषय नक्कीच नाही.
शाहरूखचा संबंध या उपद्व्यापी कार्ट्यास जन्माला घालणे यापलिकडे नाही, असे त्यासाठी मानावे लागेल. तद्वत शिल्पा शेट्टी हिच्या नवर्याने जे उद्योग केले त्यास तिला जबाबदार धरणे गैर ठरते. त्यामुळे शाहरूख वा शिल्पा यांना दोषमुक्त ठरवून त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचा उदात्तपणा समाजाने दाखवावा असे बोलले जात आहे. वरकरणी हे उचित मानले तरी आपला पोरगा असो वा नवरा हे काही दुसर्या घरात रहात नसतात आणि त्यामुळे त्यांच्या आक्षेपार्ह वर्तनाची जबाबदारी कुटुंबियांना स्वीकारावीच लागेल. खास करून जेव्हा अशा तारकांचे लाखो चाहते असतात तेव्हा तर त्यांचे वर्तन कायदा आणि नीतीमत्तेला धरूनच असायला हवे. याचे भान चाहत्यांना नसले तरी सेलिब्रिटी-आप्तांना ठेवावे लागते. सेलिब्रिटी स्टेटस जबाबदारीच्या ‘टॅग’सह येत असते.
आर्यन २३ वर्षांचा आहे. त्यामुळे पुरेसा सज्ञान आहे. त्याला गैरवर्तनाचे काय परिणाम होऊ शकतात हे चांगले ठाऊक असणार. अगदीच अडचणीत सापडलो तर वडीलांची पुण्याई मदतीला धावून येईल असा विचार त्यांनी केला असावा. तसे प्रत्यक्षात मात्र होताना दिसत नाही. काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कन्येवर अशीच कारवाई झाली होती. पण तिला वेगळा न्याय देण्यात आला नव्हता. आपले पोलिस वा अन्य अंमलबजावणी यंत्रणा अलिकडे बड्या माशांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. त्याची झलक चि. आर्यनने काही वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल क्रिकेट सामना बघताना अनुभवली होती. कायद्याचे रक्षक हिसका देताना अलिकडे मागे-पुढे पहात नसल्याचे वारंवार दिसू लागले आहे. बड्या बॅंकेच्या अधिकार्यांची जी सध्या धरपकड सुरू आहे, अफरातफर करणारे उद्योजक जेलची हवा खात आहेत,माजी मंत्र्यांनाही बेड्या ठोकल्या जात आहेत, वगैरे सारे प्रकार पहाता बड्या बापांच्या पोरांनी नीट वागायलाच हवे. याचा अर्थ सर्वसामान्यांनी कायदा हातात घ्यावा असे नाही. परंतु अनेक वर्षांनी कायदेशीर कारवाई करताना येऊ घातलेली पारदर्शकता अपेक्षित जरब निर्माण करीत आहे यात वाद नाही.
झटपट श्रीमंती आणि अचानक आणि अनपेक्षितरित्या हाती आलेले घबाड अशा गुन्ह्यांच्या मूळाशी असते. शाहरूख खान याने गॉडफादर नसताना प्रचंड मेहनत करून नाव कमावले. त्या प्रवासाचे गांभीर्य मुलामध्ये नसेल तर त्याला तशी जाणीव देण्याचे काम पालक म्हणुन त्याने करायलाच हवे होते. त्यामुळे त्याच्या दैदिप्यमान यशाला असे गालबोट लागले नसते. श्रीमंतीला साजेसे संस्कार पुढच्या पिढीत रुजवणे किती महत्त्वाचे आहे हेच आर्यन प्रकरणावरून स्पष्ट होते. चरस, गांजा आदी अंमली पदार्थांपेक्षा श्रीमंतीची नशा किती वाईट असते हे लक्षात घ्यावे लागेल.