सहकार की स्वाहाकार?

एकेकाळी सहकार क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या आणि ग्रामीण भागांत उत्कर्ष आणि समृध्दीची पहाट आणणार्‍या सहकार चळवळीस महाराष्ट्रात ग्रहण लागावे हा दुर्दैवी योगायोगच म्हणावा लागेल. रिझर्व्ह बॅंकेच्या ताज्या आकडेवारीनुसार नागरी सहकारी बँकांतील घोटाळ्यात महाराष्ट्र गेल्या तीन वर्षांपासून अव्वल आहे. देशभरात 1534 नागरी सहकारी बँका असून 1193 बॅकांतील घोटाळे उघडकीस आले आहेत. त्यापैकी २०१८-१९ मध्ये ८५३ एकट्या महाराष्ट्रात आहेत. ज्या सहकार क्षेत्राची मुहुर्तमेढ राज्यात रोवली गेली तिथेच अशी निराशाजनक कामगिरी घडावी. याला काय म्हणावे? २०१९-२० मध्ये ३८६ घोटाळे, २०-२१ मध्ये २१७ घोटाळे झाल्याची नोंद रिझर्व्ह बँकेकडे आहे. देशभरातील नागरी बँकांची स्थिती डबघाईस आली असून बुडीत खाते (एनपीए) ८४३०३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या अपघातातून बँका कशा बाहेर पडतील हा प्रश्‍न आहे. परंतु त्याहीपेक्षा या बॅंकांना गमावलेली विश्‍वासार्हता परत मिळवणे त्याहीपेक्षा कठीण होऊन बसणार आहे.
नागरी बॅकांची इतकी दुरवस्था होण्याचे कारण लपून राहिलेले नाही. त्याचा शोध घेतला असता या बँका चालवणार्‍या संचालकांकडेच संशयाची सुई जाते. सहकार क्षेत्रात राजकारण कधी आले हे निश्‍चित सांगता येणार नाही. परंतु राजकारण आले आणि सहकाराचा मूळ हेतू पुसण्याची प्रक्रिया सुरू झाली,हे मात्र खरे. राजकारणात प्रवेश करण्यासाठी सहकारी संस्थांचा मार्ग आणि राजकारण करण्यासाठी याच संस्थांचा वापर, हे समीकरण इतकं दृढ झाले की आजही बडे-बडे नेते त्याचा बिनदिक्कत गुंतल्याचे उघडकीस होऊ लागले आहे. अनेक बँका दिवाळखोरीत निघाल्या तर अनेक संचालक गजाआड गेले. परंतु या सर्व कारवायानंतर संबंधित राजकारण्यांच्या उचापती थांबल्या नाहीत. बँकांप्रमाणे सूतगिरणी, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या आदी आर्थिक उलाढालींची केंद्रे भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली.
गुणवत्ता पाहून कर्ज देणे, पारदर्शकता राखणे, नि:पक्ष आणि नि:स्वार्थी भूमिका राबवणे आणि कर्जवसुलीबरोबरच काटकसतीवर भर देणे ही सहकाराची मूलतत्वे पायदळी तुडवली गेली. ग्रामीण विकासाला एकेकाळी उर्जित अवस्था बहाल करणार्‍या सहकारी संस्था असोत की शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना मदत करणार्‍या नागरी सहकारी बॅंका असोत. त्या भ्रष्टाचाराची कुरणे झाल्या. आता बुडीत खात्याचा शिक्का माथी लागल्याने त्या पडद्याआड झाल्या तर आश्चर्य वाटू नये. हे वेळीच थांबले नाही तर त्यांना वाचवणे अशक्य होऊन बसणार आहे.