टोलनाके का फोडले जातात?

महाराष्ट्रात टोल-संस्कृती न रुजण्यामागे केवळ टोलला विरोध करणारे जबाबदार आहेत, असे म्हणता येणार नाही. टोल-वसूल करताना त्या मोबदल्यात पार पाडावयाच्या कर्तव्यांचा विसर टोल-ठेकेदारास होत असतो आणि त्यामुळे या संकल्पनेला सुरुवातीपासूनच नकारात्मकतेचे ग्रहण लागले हे लक्षात घ्यावे लागेल. सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे-भिवंडी दरम्यान असलेला कशेळी टोलनाका फोडला. या हिंसाचाराचे समर्थन करता येणार नाही, परंतु रस्त्यांची दुर्दशा दूर करण्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष करणे उचित नव्हते, हे कबूल करावे लागेल. टोलबद्दल असलेला सुप्त संताप अशा प्रसंगामुळे उफाळून बाहेर पडतो आणि तो रोखण्याकडे कोणी लक्ष देत नाही हेच अशा घटनेतून स्पष्ट होते.

टोल-वसुलीमागचे कारण कितीही शास्त्रोक्त असल्याचे सांगितले जात असले तरी त्यात लबाडी असते हे जनता जाणून चुकली आहे. या लबाडीत सर्वपक्षीयांचा सहभाग असतो आणि अनेकदा आंदोलनाच्या माध्यमातून तोडबाजी होत असल्याची अशी वदंता आहे. त्यामुळे जनता एकुणातच टोल, त्याविरुध्द होणारी आंदोलने वगैरे याकडे संशयानेच पहात असतात. असे असले तरी टोल हा मन:स्तापाचा विषय आहे आणि त्याविरुध्द आवाज उठवणार्‍यांबद्दल क्षणभर का होईना सहानुभूती वाटून जाते. तशी मनसेबद्दल वाटली तर आश्‍चर्य नाही. परंतु मनसेने केवळ शक्तीप्रदर्शन म्हणुन अशा आंदोलनाकडे पाहू नये तर जनतेला भरलेल्या टोलचा योग्य मोबदला मिळतो की नाही, हे पहावे.

टोलची संकल्पना पाश्‍चात्य देशातून आपल्याकडे आली आणि रुजली. परंतु त्या देशांमध्ये टोलपोटी असलेले उत्तरदायित्व प्रामाणिकपणे पाळले जाते. खड्डेविरहित रस्त्यांपासून आणीबाणीच्या प्रसंगात मदत मिळण्यापर्यंतची जबाबदारी शासन घेत असते. आपल्याकडे शासनाला ‘सांभाळण्या’चे एकमेव कर्तव्य व्यवस्थित पार पाडले जात असते. रस्त्याच्या निर्मितीसाठी झालेला खर्च वसूल होऊनही चढ्या दराने टोलवसुली कशी चालू रहाते, या गौडबंगालाचे उत्तर कोणी देऊ शकलेले नाही. मनसेच्या आंदोलकांनी जनतेच्या मनातील या प्रश्‍नाचे उत्तर मिळवावे.

टोल भरण्याबद्दल एरवी कोणाचा आक्षेप असायचे कारण नव्हते. परंतु टोलच्या मोबदल्यात अपेक्षित सेवा मिळत नसल्यामुळे उद्रेक खदखदत रहातो. या आगीत तेल ओतण्याचे काम टोल नाक्यावरील कर्मचारी मोठ्या कार्यक्षमतेने करीत असतात. त्यांना जणू सौजन्याने वागले पाहिजे हेच शिकवले गेले नसावे. उध्दटपणा या एकमेव गुणावर टोलनाक्यावर नोकरी मिळते की काय अशा प्रश्‍न अनेकांच्या मनात डोकावून जातो. हे टोलनाके आहेत की अपमान करण्याचे अड्डे, असेही वाटते. त्यामुळे खदखदणार्‍या भावनांना आपसुक खतपाणी मिळते. या कर्मचार्‍यांना ते सेवा क्षेत्रात काम करीत आहेत याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. टोलवसुलीतील भ्रष्टाचार आणि कर्मचार्‍यांचे वर्तन यामुळे टोलनाक्यांवर भडास निघतो. तो थांबवण्यासाठी पारदर्शक व्यवहार आणि सौजन्यपूर्ण वर्तन यांची नितांत गरज आहे.