आयुष्यावर प्रदूषणाचा घाला

कोरोनामुळे का होईना व्यक्तीगत स्वच्छतेला महत्व प्राप्त झाले आहे. जुन्या सवयींना तिलांजली देऊन नव्या सवयी कायद्याच्या का होईना धाकाने आता अंगवळणी पडू लागल्या आहेत. आरोग्याला हितकारक वर्तन कारवाईच्या धाकापोटीच येणे चांगले नाही. परंतु समाजाला तशी सवय लागली आहे, हे खरे. स्वच्छतेप्रमाणे आणखी एक बाब आपण हलक्यात घेत असतो आणि ती म्हणजे प्रदूषण. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे धिंडवडे काढणारा अहवाल अमेरिकेतील शिकागो येथील एनर्जी पॉलीसी इन्स्टिट्यूटने सादर केला असून मुंबई आणि भवतालची शहरे तसे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील आकडेवारी किती चिंताजनक आहे हे त्यावरून दिसते. महाराष्ट्रात सरासरी आयुमर्यादा चार वर्षे कमी होत असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.

हवामानातील बदल हा जगाला भेडसावणारा नवा प्रश्‍न हाहा:कार माजवत असल्याच्या घटना घडू लागल्या आहे. दुष्काळी भागांत महापूर तर बर्फाळ प्रदेशात तापमानात वाढ असे विचित्र प्रकार गेल्या दोन-चार वर्षात घडू लागले असून युरोपातील शहरे पाण्याने वेढली जात असतात तर अचानक कोसळणार्‍या पावसाने जमिनी खचण्यापासून दरड कोसळण्यापर्यंचे अपघात नित्याचे झाले आहेत. याचे कारण हवामानातील बदल आहे. परंतु त्याचबरोबर निसर्गाचा र्‍हास करण्याचा वेगही वाढला असून हवेतील प्रदूषण थैमान घालू लागल्याचे शिकागोच्या संस्थेचा अहवाल सांगतो.

प्रदूषण, वनीकरण आदी बाबी हलक्यात घेतल्या जात असल्यामुळेच एक मोठे संकट आपण स्वकर्तृत्त्वाने निर्माण करीत आहोत. हवेतील प्रदूषणामुळे श्‍वसन संस्थेचे कार्य बिघडते आणि कोरोनामुळे झालेले मृत्यू फुफ्फूसाच्या विकारामुळे अधिक होते हे लक्षात घ्यावे लागेल. वाहनांचे या प्रदूषणात योगदान असले तरी औद्योगिकीकरण आणि आधुनिक जीवनशैली त्यास जबाबदार आहे. वातानुकूलन वातावरणाची इतकी सवय जडली आहे की त्यामुळे ओझोनचे प्रमाण घटू लागले आहे हेच आपण लक्षात घेतलेले नाही. विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड आणि औद्योगिक विकासामुळे हवेतील धुलींकण असो की सल्फर वा कार्बन डाय-ऑक्साईड यांसारखे घातक वायू हवेत पसरल्यामुळे श्‍वसनावर विपरित परिणाम होत असतो. ते रोखण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न व्हायला हवेत. परंतु वसुंधरादिन साजरा करण्यापलिकडे प्रदूषणाचा विषय गेलेला नाही असेच आता म्हणावे लागेल. जाता-जाता, ठाणे महापालिकेने बसवलेली प्रदूषण मोजणारी यंत्रणा बंद आहे. प्रदूषण किती हलक्यात घेतले जाते त्याचा हा पुरावा आहे.