कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आणि त्याची झळ समाजातील सर्व स्थरांना लागली. गरीब माणसांच्या जगण्याची लढाई आजही सुरू आहे. मध्यमवर्ग आणि श्रीमंत व्यावसायिक हळूहळू सावरू लागले असले तरी तिसर्या लाटेची टांगती तलवार सर्वांवरच आहे. अशा अनिश्चित वातावरणात भारतीय अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत २०.१ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ही उसळी सुचिन्ह मानले जात असून ढासळलेली अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल असा आशावाद निर्माण करणारी आहे.
गेल्या वर्षी (२०२०-२१) च्या पहिल्या तिमाहीत विकासाचा दर उणे २४.४ टक्के इतका गडगडला होता. त्यामुळे यंदाची कामगिरी निश्चितच दिलासादायक आहे. जी सुधारणा दिसत आहे,ती पहाता जागतिक बँकेने आणि रिझर्व्ह बँकेने केलेले अनुमान खरे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना त्याचा अनुकूल परिणाम सर्वसामान्य नागरीकांच्या जगण्यावर होईल ही अपेक्षा. महागाईमुळे त्रस्त जनतेला एकीकडे बेरोजगारीने ग्रासले आहे. लाखो लोकांच्या नोकर्या गेल्या आणि संसार उध्वस्त झाले. अशा नागरीकांपर्यंत अर्थउभारी स्पर्श करील ही अपेक्षा आहे. पेट्रोल आणि गॅसचे वाढते दर, आभाळाला भिडणारी महागाई, बेरोजगारी, औषध उपचारांवर होणारा खर्च, ऑनलाईन शिक्षणावर होणारा खर्च, आदी बाबींमुळे असहाय्य झालेला सामान्य माणूस या ताज्या घडामोडीमुळे सुटकेचा नि:श्वास सोडू शकेल. अर्थव्यवस्थेला आलेली ही धुगधुगी टिकून रहाण्यासाठी कोरोना रोखण्याचे प्रतिबंध शिथील होणे तितकेच आवश्यक आहे. त्यास शासन फार अनुकूल नाही. टाळेबंदी पूर्णपणे रद्द झाल्यावर आणि जनजीवन कोरोनापूर्व काळासारखे झाले तर रोगाचा प्रादुर्भाव वाढेल ही भीती शासनाला वाटत आहे. दुसर्या लाटेच्या वेळी प्राणवायूटंचाईमुळे उडालेली तारांबळ आणि मृत्यूच्या प्रमाणात झालेली वाढ यांमुळे शासन शिथीलकरणाची जोखिम घेण्याच्या मन:स्थितीत नाही. ती बदलावी असे जनतेला आणि विशेषत: विरोधी पक्षांना वाटत आहे. त्याचा राजकीय श्लेष काढणारे काढतील, परंतु अर्थचक्रास आलेली गती वाढवण्यासाठी सरकारला थोडी जोखिम घ्यावी लागेलच. सण साजरे करणे अथवा देवळे उघडणे यावर राजकारणी एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसतात. त्यापेक्षा सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य कसे होईल यावर त्यांनी भर द्यायला हवा. रुग्णसंख्या घटली तरच आत्मविश्वास वाढणार आहे. त्यासाठी शिस्तीची मात्रा कमी होता कामा नये. आशेचे किरण हातून निसटता कामा नये.