तुमच्यामुळेच डगमगलो नाही!

सुवर्ण महोत्सव समीप येत असताना ‘ठाणेवैभव’च्या ४७व्या वर्धापनदिनावर त्या सुवर्णक्षणाचा उत्साह आणि चैतन्य प्रतिबिंबीत होणे अपेक्षित असते. गेली साडे-चार दशके खडतर वाटेवरून सुरू झालेल्या प्रवासात आम्ही प्रयोगशिलतेला नेहमीच कवेत घेतले. विधायक पत्रकारितेला कल्पकतेची जोड देत ‘ठाणेवैभव’ने आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील स्थानिक दैनिकांच्या इतिहासात मानाचे पान मिळवण्याचे समाधान जरूर आहे. गेल्या वर्षीही कोरोनाचे सावट वर्धापनदिनावर होते, ते भले आता फिक्के होत चालले असले तरी वर्धापनदिन अंकावर त्याचा निश्‍चितच विपरित झाला आहे. परंतु जबाबदार पत्रकारितेचे व्रत या आव्हानात्मक काळात जपल्याने आम्ही मोठ्या आशेने त्या सुवर्ण क्षणाकडे कूच करीत रहाणार. हा दुर्दम्य विश्‍वास आमच्या तमाम वाचक, वितरक आणि जाहिरातदारांनी आम्हाला दिला आहे. त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
पुढील काही काळ सर्वच मुद्रित माध्यमांना, खास करुन दैनिक वर्तमानपत्रांना कठीण जाणार आहे. कोरोनामुळे आर्थिक आणि सामाजिक उलथापालथ झाली आहे. अनेक दैनिके बंद पडली आणि जी सुरू आहेत त्यांची वाचकसंख्या रोडावली आहे. ‘ठाणेवैभव’ त्यास अपवाद नाही. परंतु चार दशकांचे योगदान आणि पुण्याई तसेच विश्‍वासार्हता यांच्या जोरावर आम्ही वाचकांशी आणि जाहीरातदारांशी जोडणारा पूल जोडण्यात यशस्वी होऊ लागलो आहोत. यामागे सर्वात प्रमुख कारण नकारात्मकतेच्या अंधारात आम्ही सकारात्मकतेची मशाल घेऊन पुढे निघालो आहोत. आम्ही या भीषण काळात एकही दिवस वाचक निराशेच्या खाईत लोटले जातील अशा बातम्या छापण्याचे टाळले. पत्रकारांनी जनतेच्या आश्रूंना वाट करून देणे जितके अपेक्षित आहे तितकेच धीर देणे. ‘ठाणेवैभव’ने धिर दिला, असे सांगणारे असंख्य वाचक आम्हाला लाभले. भविष्यातील आमच्या योजनांची तीच खरी पुंजी आहे.
वाचकांची वर्तमानपत्रे विकत घेण्याची आणि वाचण्याची सवय मोडली, हे कटू सत्य या क्षेत्रात नि:स्वार्थीपणे काम करणार्‍यांना अनुभवयास येत आहे. वर्तमानपत्र विकत घेणे प्राप्त आर्थिक परिस्थितीत प्राधान्यक्रमात मागे पडले आहे. जे वर्तमानपत्र धिर देण्याचे, दर्जा राखण्याचे आणि विनाकारण सनसनाटीच्या मागे लागणार नाही अशा वर्तमानपत्रांना प्राधान्यक्रमात वरचे स्थान मिळत आहे. ‘ठाणेवैभव’ या तीन कसोट्यांवर वाचकांच्या पसंतीस उतरत आहे. यामागे ‘ठाणेवैभव’कार नरेंद्र बल्लाळ यांची शिकवण आणि संस्कार कारणीभूत आहे. वर्तमानपत्र या विचित्र पर्यावरणात तग धरणे कठीण होत असताना आम्ही ‘ठाणेवैभव’मध्ये एक आशादायक संरचना निर्माण करू शकलो.
या महासंकटात टिकून रहाणेही भल्याभल्यांना कठीण होऊन बसले असताना ‘ठाणेवैभव’ मात्र पाय रोवून घट्ट उभा आहे. या पायांना आणि आमच्या ध्येयासक्तीस बळ देणार्‍या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानून आम्ही आगामी काळात घोडदौड करून दाखवू असा आत्मविश्‍वास वाटतो.