कल्याण ते अंतराळ !

आपल्या पोरी आता कोणाला ऐकणार नाहीत. सावित्रीबाई फुले आणि धोंडो केशव कर्वे यांच्या स्वप्नाला या पोरी जागत आहेत. अंतराळ सफरीच्या बातम्या ऐकून तर असेच म्हणावे लागेल. चार दिवसांपूर्वी रिचर्ड ब्रॅन्सन या अब्जोपतीने अंतराळ प्रवास करून इतिहास घडवला तेव्हा त्या अंतराळ यानात असलेल्या सहा जणांपैकी एक तरुणी भारतीय वंशाची होती. तिचे नाव होते सिरिशा बांदला. भारतीयांचे ऊर अभिमानाने भरून आले असताना आणखी एका भारतीय तरुणी इतिहास घडवण्याच्या तयारीत असल्याची आनंददायी बातमी आपल्याला समजली आहे. अ‍ॅमेझोनचे मालक जेफ बेझोस येत्या २० जुलै रोजी एका खासगी यानाने निवडक पर्यटकांना घेऊन अंतराळात जाणार आहेत आणि त्यात असणार आहे आपल्या कल्याणची सुकन्या संजल गावंडे!
संजल ही अभियांत्रिकी शाखेची पदवीधर असून परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणार्‍या हजारो भारतीय तरुणांपैकी ती एक आहे. तिने बेझोस ज्या यानातून जाणार आहेत त्या यानाचे आरेखन केले आहे. त्यामुळे पहिल्या दहा जणांच्या पथकात तिला संधी मिळाली आहे.
एमटीएनएलमध्ये नोकरी करणारी आई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतून निवृत्त झालेले वडील अशी सामान्य पार्श्‍वभूमी संजलच्या कुटुंबाची आहे. पण म्हणून कोळसेवाडीत राहणार्‍या या तरुणीने मोठी स्वप्ने पहाणे कधी सोडले नाही. कल्याणच्या मॉडेल शाळेत आणि पुढे बिर्ला महाविद्यालयात बारावी आणि नंतर नवी मुंबईतील फादर अ‍ॅग्नल महाविद्यालयातून पदवी असा प्रवास करीत संजल आत्मविश्‍वास आणि महत्वकांक्षा यांच्या पंखांवर स्वार होऊन अमेरिकेत दाखल झाली. तिथे तिने मिशिगन विद्यापीठातून मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणीत येण्याचा मान मिळवला. सातत्याने साद घालणार्‍या आकाशाने तिला स्वस्त बसू दिले नाही आणि शनिवार-रविवारच्या सुट्टीत वैमानिकाचा परवाना मिळवला. तिने ‘नासा’ मध्येही नोकरीसाठी अर्ज केला होता. परंतु नागरीकत्वाच्या मुद्यावर तिला संधी मिळाली नाही. पण हातपाय गाळून बसणे संजलला माहीत नसावे. तिच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीने तिला स्वप्नपूर्तीच्या ध्यासापासून विचलित केले नाही. बेझोस यांच्या यानाचे आरेखन करण्याची संधी तिला मिळाली आणि त्यामुळेच कल्याणची ही सुकन्या आता चक्क अंतराळास गवसणी घालणार आहे. आपल्या मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार्‍या सुधारकांचे पांग या पोरी फेडत आहेत. कल्पना चावला, सुनिता विल्यिम्स, सिरीशा बांदला आणि आता संजल गावंडे! अंतराळ भारतीय तारकांनी व्यापून चालले आहे.