महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार येत्या काही दिवसांत अडचणीत आले तर आश्चर्य वाटू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नाव न घेता त्यांच्या स्वबळाच्या भाषेचा समाचार घेतला. यामुळे काँग्रेस सरकारमधून बाहेर पडली तर आश्चर्य नाही. त्यांच्यासमोर सत्ता की स्वाभिमान असे दोन पर्याय आहेत आणि त्यातून स्वाभिमानाची निवड झाली तर सरकार गडगडू शकते. श्री. ठाकरे यांनी तरीही जोखिम घेतली असेल तर राज्यात होऊ घातलेल्या संभाव्य घडामोडींमागे गेल्या काही दिवसांतील घटनांचा संबंध आहे काय हे तपासावे लागेल. ठाकरे-मोदी भेट असो की पवार-प्रशांत किशोर बैठक,यांचा नजिकच्या भविष्यात उलगडत जाणाऱ्या घटनांशी संबंध असेल. मध्यावधी निवडणुकांची ही पूर्वतयारी तर नव्हे,अशी शंका आम्ही दोन आठवड्यांपूर्वी या स्तंभातून व्यक्त केली होती.
काँग्रेसचे शिवसेनेशी थेट वैर नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे मैत्रही नाही. शरद पवार आणि ठाकरे कुटुंबिय यांच्यातील ॠणानुबंध काँग्रेसला सेनेशी जवळीक साधण्यापासून दूर ठेवत आहे. भरीसभर राष्ट्रवादीशी असलेले त्यांचे वैर जुनेच आहे. काँग्रेस प्रदेश समितीने श्रेष्ठींकडे महाविकास आघाडी किमान-समान-कार्यक्रम राबवत नसल्याची वारंवार तक्रार करीत असते. काँग्रेसचे मंत्रीही दुजाभाव मिळत असल्याची तक्रार करीत असतात. महाविकासआघाडीत सुरूंग लागला तर तो काँग्रेसतर्फे लागू शकतो. एक प्रकारे तो टाईम बॉम्ब आहे आणि ठाकरे यांच्या ताज्या विधानामुळे त्याची टिकटिक वाढू शकते. काँग्रेस सत्तेत असली तरी तिला अपेक्षित सहकार्य आणि सन्मान मिळत नव्हता हे त्यांच्याच नेत्यांनी जाहीरपणे कबूल केले आहे. यामुळे हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न होण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी उलट त्यांची कानउघडणी करावी यामागे काही वेगळेच राजकारण तर शिजत नसावे ना, असा प्रश्न पडतो.
काँग्रेसची स्वबळाची भाषा त्यांच्या आत्मसन्मानापोटी आहे. एक सर्वात जुना आणि राष्ट्रीय दर्ज्याच्या पक्षाला दोन प्रादेशिक पक्ष कसे काय नाचवू शकतात? या अस्वस्थतेतून पक्षाची भूमिका ठरणार आहे. स्वबळाची भाषा करून काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारच्या चुकांपासून स्वतःला अलिप्त करू पहात आहे. ॲंटीइन्कब्नसीच्या फटक्यापासून वाचण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना अस्तित्व शाबूत ठेवायचे आहे. तसे पाहिला गेले तर ते योग्यही आहे. परंतु स्वबळावर निवडणूक जिंकण्यासाठी आत्मबळ आहे काय या श्री. ठाकरे यांच्या प्रश्नांवर डोक्यात राग घालून घेण्याऐवजी त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. मतदार आपल्याला किती गांभीर्याने घेतील याचा त्यांनी विचार करायला हवा. सत्तेबाहेर राहून जी काही उरलीसुरली धुगधुगी आहे त्यावर स्वतःच्या हातांनी पाणी शिंपडण्यासारखे होईल. सत्तेतून बाहेर पडणे म्हणजे सहानुभूती मिळवणे असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल. सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय आत्मघातकी ठरू शकतो. पण शेवटी आत्मसन्मानाचाही प्रश्न असतोच की! आमच्या मते स्वबळाचे खरे कारण हे अस्तित्वाच्या लढाईशी निगडीत आहे. काँग्रेसला मिळणारी स्पेस राष्ट्रवादी काबिज करण्याच्या तयारीत असून त्यांना त्या प्रक्रियेत सेनेचा हातभार मिळत आहे, असे काँग्रेसला वाटत आहे. ही व्युहरचना आहे की षडयंत्र हे काँग्रेसला वाटू लागणे स्वबळाच्या भाषेच्या केंद्रस्थानी आहे. दिल्लीत बसलेल्या हाय कमांडला महाराष्ट्रातील सरकार धोक्यात येण्यापेक्षा आपल्या अखिल भारतीय दर्जास कोणी आव्हान दिलेले खपणार नाही. त्याचा परिणाम भले मग काहीही होवो, ते अशा राजकारणात स्वतःचा वापर (की बळी?) होऊ देणार नाही. नाना पटोले असोत की भाई जगताप हे हायकमांडचे संकेत तर व्यक्त करीत नसावेत?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने बजावलेल्या कामगिरीचे श्री. ठाकरे यांनी कौतुक केले आहे. बंगाली जनतेने अस्मितेचा मुद्दा कसा जपला याची आठवण ते मराठी बांधवांना करून देत आहेत. ममता यांच्या यशाबाबत दुमत असायचे काही कारण नाही. परंतु या यशाची सेनेला पुनरावृत्ती करायचीच असेल तर त्यांनाही स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जावे लागेल. परंतु तुर्तास ते राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याच्या मूडमध्ये दिसतात. यामध्ये त्यांची सोय असली तरी आम शिवसैनिकांची आणि सेनेच्या मतदारांची त्यास अनुमती आहे काय हे तपासून पहावे लागेल. राज्यात निवडणुकीनंतर आघाडी झाली होती, आणि मतदारांसमोर कोणाला मत द्यायचे हा पेच नव्हता. आता मात्र हा पेच असेल आणि त्याचा फायदा काँग्रेसने संघटनात्मक बदल आणि योग्य गृहपाठ करून उचलण्याची स्वबळाची व्युहरचना केली असेल तर ती योग्य ठरू शकेल. काँग्रेसची आता टिंगल करणे म्हणुनच योग्य होणार नाही. महाराष्ट्राने या पक्षाला एकेकाळी भरभरून पाठिंबा दिला होता हे नाकारून चालणार नाही. प्रश्न फक्त हायकमांड प्रदेश समितीच्या स्वबळाच्या नार्यावर कोणती पावले उचलते हा आहे. काँग्रेस ‘पंजा’ लढवण्याच्या तयारीत आहे हे नक्की. ठाकरे यांच्या विधानामुळे ते हुस्कावले गेले असतील तर नवल नाही.