‘व्हॉटसअ‍ॅप’ की दुनिया!

एका पक्षाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजी आहे तर प्रतिपक्षाला या स्वातंत्र्याचा अतिरेक होऊन देशातील कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे वाटत आहे. उभय पक्षांना आपापले म्हणणे उचित वाटत असले तरी त्यांचा एकमेकांवर विश्‍वास नाही, असाच प्राथमिक निष्कर्ष व्हॉटसअ‍ॅप विरूद्ध केंद्र सरकार यांच्यात सुरू झालेल्या कायदेशीर लढाईतून काढता येऊ शकेल. दोघेही आपापले हीत जपण्यासाठी युक्तीवाद करीत असून त्यांच्या मुळाशी असलेल्या खर्‍या हेतूबदल शंका आहे. ही शंका आणि घटनाकारांनी अधोरेखित केलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची सांगड घालून त्याला नैतिकतेचे आवरण घालण्यात येत आहे. या दोहोंपैकी एकाची फरफट व्हायची नसेल तर दोघांनाही आपल्या हेतूबदल प्रामाणिक राहून स्वातंत्र्याच्या मर्यादा निश्‍चित कराव्या लागतील.
समाजमाध्यमातील व्हॉटसअ‍ॅप सारख्या लोकप्रिय सुविधेचा व्यापक वापर सुरू आहे. त्यात निरूपद्रवी खाजगी संभाषणांपासून ते अत्यंत गंभीर अशा राजकीय, सामाजिक आणि धार्मिक बाबींवर अनिर्बंध अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. या माध्यमाच्या प्रसाराचा वेग पाहता या प्रतिक्रियांचा परिणाम सर्वदूर आणि लक्षणीय होत असतो. त्यातून उमटणाऱ्या प्रतिक्रियांतून वातावरण ढवळून निघते आणि प्रसंगी पडलेल्या ठिणगीतून आगडोंब उसळतो. हे सारे अल्पावधित होत असते. सरकारला जोवर असे उमटणारे तरंग आल्हाददायक वाटतात तोवर त्यांचा आक्षेप नसतो. परंतु अशा तरंगांतून आंदोलनांची निष्पत्ती होते तेव्हा सरकारसमोर आव्हान उभे ठाकते. असे वातावरण त्यांना खचितच मानवणारे नसते. अशा वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची संकल्पना म्हणजे स्वैराचार नव्हे, असा पवित्रा घेतला जाऊ शकतो. सरकारतर्फे न्यायालयात हेच सांगितले गेले. तसे पाहिला गेले तर देशहिताला निर्विवादपणे प्राधान्य असताना व्हॉटसअ‍ॅपने नियम पाळावेत याबद्दल सरकारने धरलेला आग्रह समर्थनीय ठरतो. देशात लोकशाही नसती तर ही पाळीही त्यांच्यावर आली नसती. तिथे विरोधकांना तशी संधीही नसते. किेंबहुना व्हॉटसअ‍ॅपलाही न्यायालयात जाण्याची मुभा मिळाली नसती. परंतु लोकशाहीत याला मुस्कटदाबी म्हटले जाते आणि सरकारला या वादात विरोधकांचा पाठिंबा नाही. सरकार त्याचा प्रतिवाद करीत आहे. मर्यादीत स्वातंत्र्य आणि मुस्कटदाबी यातील फरक लक्षात घ्यावा लागेल. अन्यथा सरकार आपल्या अधिकाराचा बळजबरीने वापर करीत आहे, असा अर्थ निघू शकतो.
एकीकडे सरकारचा हा युक्तीवाद अमान्य असणार्‍या व्हॉटसअ‍ॅपला या मोफत सुविधेच्या माध्यमातून मोठे जाळे निर्माण करता आले आहे. ज्याला ‘डेटा’ म्हणतात अशी मती सुन्न करणारी आभासी संपत्ती त्यांच्यापाशी तयार झाली आहे. या संपत्तीचा ते राजकारणापासून वाणिज्य वापरासाठी उपयोग करू शकतात. त्यातून अब्जावधी रुपयांची उलाढाल होऊ शकते. राजकीय सत्ता उलथवली जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय संवेदनशील विषयांत जनमत तयार करता येते. सुसंवाद आणि सलोखा हा प्राथमिक हेतू असला तरी मत-मतांतरे होऊन तणाव निर्माण होऊ शकतात. भिन्न राष्ट्र, तेथील भिन्न संस्कृती, मूल्य व्यवस्था, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, स्वातंत्र्याच्या बदलत जाणार्‍या व्याख्या यामुळे व्हॉटसअ‍ॅपच उपयोग आणि दुरुपयोग हा नेहमीच वादाचा विषय रहाणार. अशा वेळी आपल्या देशाचे हीत सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न सरकारे करीत राहणार.