भात लागवडीसाठी पोषक वातावरण
भाईंदर: यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने वसईतील बळीराजाने भातपीक घेण्यासाठी कंबर कसली आहे. जून महिन्यात पावसाने काही काळ दडी मारली असली तरी शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसावर शेतकऱ्यांनी भातपेरणी आटोपती घेतली आहे. वसईतील ९७ टक्के भातपेरण्या पूर्ण झाल्या असून १० टक्के भात लागवडही पूर्ण झाली आहे.
वसईच्या ग्रामीण भागात सुमारे १२१ गावांत भातशेती केली जात आहे. यंदा ७२२६ हेक्टर क्षेत्र भातपिकाखाली आहे, अशी माहिती तालुका कृषी विभागाने दिली. येत्या १५ दिवसांत भात लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. वसईत पावसाने चांगलाच तग धरून ठेवल्याने पेरणी केलेल्या भातपिकाला उत्तम रोपे आली आहेत. त्यामुळे वसईत आता भात लागवडीला सुरुवात झाली असून शेतकरी वर्ग आनंदात आहे. सुरुवातीला दडी मारलेल्या पावसाने आता वसईतील शेतकऱ्यांना खूश केले आहे.
पावसाच्या सुरुवातीला पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील भाताची रोपे जोम धरून लावणीसाठी तयार झाली असून लावणीच्या कामास सुरुवात झाली आहे. दमदार पावसामुळे शेते पाण्याने भरली असून भात लागवडीस आवश्यक अशीच आहेत. त्यामुळे वसईच्या पूर्व व पश्चिम भागात लागवडीच्या कामांची लगबग दिसत आहे. तर वसईच्या पश्चिम पट्ट्यात काही ठिकाणी भातलागवडीला सुरुवात झाली आहे. तसेच काही ठिकाणी उशिराने पेरणी झाल्याने काही ठिकाणी उशिराने लागवडीस सुरुवात होणार आहे.
वसई तालुक्याच्या ग्रामीण भागात रत्न, जया, सुवर्णा,कर्जत, राशीपुनम, कोलम, सुमा, सुंदर, मसुरी, गुजरात ४, गुजरात ११, रूपाली, अंकुर अशा विविध भातबियाणांची लागवड केली जाते. वसई तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी तीन हजार ५०० हेक्टर बागायती शेतीचे क्षेत्र आहे. तर ७२२६ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. तसेच उर्वरित क्षेत्र ओस पडले आहे. सध्या सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण येथील शेतकरी आपापल्या शेतावरच करीत असल्याचे दृश्य सध्या वसईत दिसत आहे. सकाळच्या सत्रात लावणी करावयाच्या शेतात चिखलणी केली जात आहे तर दुपारनंतर रोप लावणीची कामे शेतकरी घेत आहेत. अधून मधून बरसणारा पाऊस व पडणारे ऊन हे भात शेतीसाठी अतिशय पोषक वातावरण असल्याचे चित्र आहे.